पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, बियांचा व समाजाचा आहे – पद्मश्री राहीबाई पोपरे

महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली

नवी दिल्ली ११ पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात झालेल्या सत्कारासमयी व्यक्त केल्या.

मंगळवारी सायंकाळी ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांनी परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. परिचय केंद्राच्या जनसपंर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्राीमती पोपरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ इन्स्टीट‌्यूट फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहूड ॲण्ड डेव्हलपमेंटचे विशेष तज्ज्ञ संजय पाटील, विभागीय अधिकारी जितीन साठे, योगेश नवले आणि लक्ष्मण डगळे सोबत होते. माहिती अधिकारी अंजु‍ निमसरकार यांच्या सह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सोमवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राहीबाई पोपरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  श्रीमती पोपरे यांनी आतापर्यंत ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे.

प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्लच्या प्रतिक्रिया देताना श्रीमती  पोपरे म्हणाल्या, हा पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, माझ्या बीयांचा, निसर्गाचा आणि आपल्या समाजाचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या.  मागील २५ वर्षांपासून देशी बीया घरी जतन करत असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती जगाला व्हावी म्हणून बायफ संस्थेची मोठी मदत झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच गावपातळीवर कळसुबाई समिती स्थापन झाली असून सद्या संस्थेच्या सहाय्याने ३ हजार महिलांसोबत हे काम सुरू असल्याची माहिती श्रीमती पोपरे यांनी यावेळी दिली.

ज्या प्रकारे गावरान बीज बँक अहमदनगर जिह्यात  झाली आहे अशाचप्रकारे गावोगावी अशा बीज बँका निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *