निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी

यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना होणार लाभ

मुंबई दि. १३ : निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील काही भागास अधिकचे पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. हा निर्णय मराठवाड्याच्या दृष्टीने दिलासादायक ठरणार असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. या पूर्वी विविध बैठकांमध्ये पैनगंगा नदीत ११७.८७ टीएमसी पाणी आहे, असे गृहित धरून आंध्र प्रदेश शासनासोबत चर्चा केली जात होती.

अलीकडेच मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाण्याबाबत  समस्या मांडल्या. जल विज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले.

या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तूट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर आणि नियोजन पूस, अरूणावती व उर्ध्वपैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा मधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या निर्णयाने हिंगोली, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले आहे. मराठवाड्यात अधिक समृद्धी येण्यासाठी ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी येत्या काळात जलसंपदा विभागामार्फत केल्या जातील, असेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *