राज्यात पुन्हा ‘महा आवास अभियान’ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १७ : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता वाढीसाठी राज्यात दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ‘महा आवास अभियान – ग्रामीण २०२१-२२’ राबविण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या अभियान कालावधीत पाच लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार असून विविध शासकीय योजनांच्या कृतीसंगमातून लाभार्थ्यांचे जीवनमान देखील उंचावण्यास मदत होणार असल्याची ग्वाही श्री.मुश्रीफ यांनी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

राज्यात दिनांक २० नोव्हेंबर, २०२० ते ५ जून, २०२१ या कालावधीत राबविण्यात आलेले महा आवास अभियान यशस्वी झाल्याने यावर्षीही २० नोव्हेंबर या ‘राष्ट्रीय आवास दिना’चे औचित्य साधून महा आवास अभियान २०२१-२२राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानात भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे १०० टक्के मंजूरी देणे, पहिल्या हप्त्याचे १०० टक्के वितरण, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण, डेमो हाऊसेस, विविध शासकीय योजनांशी कृती संगम इ. उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अभियानात बहुमजली गृहसंकुले, भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लँण्ड बँक, वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी सँण्ड बँक, वाळूला पर्यायी साहित्य वापरण्यासाठी प्रोत्साहन, किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञान, रेन वॉटर हार्वेस्टींग, सौर उर्जा साधन व नेट बिलींग इ. चा वापर इ. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अभियान कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तीस राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्राम पंचायत स्तरावरुन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्राम विकास मंत्री श्री.मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *