‘आपले पूर्वांचल’ हे पुस्तक मोहन बने यांच्या छायाचित्रणातील अमृतमंथनाचे नवनीत

मुंबई, दि. २२: ‘स्वर्गीय सौंदर्याचे आपले पूर्वांचल’ हे छायाचित्रकार मोहन बने यांचे पुस्तक त्यांच्या छायाचित्रणातील चार दशकांच्या तपस्येच्या अमृत मंथनातून निघालेले नवनीत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

पूर्वोत्तर भारतातील आठ राज्यांमध्ये राहून तेथील समाजजीवन व निसर्ग सौंदर्याचे वर्णन तसेच छायाचित्रण असलेल्या  छायाचित्रकार मोहन बने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत रविवारी (दि. २१) राजभवन येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.  सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष किशोर रांगणेकर व इंडिया प्रिंटिंग वर्क्सचे मुद्रक आनंद लिमये यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. हे पुस्तक गौरधन व्हिजनतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.

मोहन बने यांनी केवळ पर्यटकाच्या दृष्टिकोनातून पूर्वोत्तर राज्यांचे छायाचित्रण केले नसून त्यांनी त्या प्रदेशाशी व तेथील जनसामान्यांशी तादात्म्य होऊन समर्पण भावनेने लिहिल्यामुळे त्यांचे पुस्तक प्रेरणादायी झाले आहे असे राज्यपालांनी सांगितले.’आपले पूर्वांचल’ सारखी चांगली पुस्तके समाजापुढे आली पाहिजे तसेच  मोहन बने यांच्या कॅमेरातून व प्रतिभेतून अधिकाधिक चांगल्या कृती समाजासमोर आल्या पाहिजे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी घोडवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील सरपंच वैदेही वैभव बने, शिल्पकार शशी वडके, नर्मदा परिक्रमा करणाऱ्या रश्मी महेश विचारे तसेच ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व मोहन बने यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *