६ लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. २४ : गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे. या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा-२ मध्ये ५ लाख घरे बांधण्याचे माझे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा आज संकल्प करून महाराष्ट्र राज्य अन्य राज्याच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केला.

महाआवास अभियान- ग्रामीण टप्पा-२ चा शुभारंभ आज मंत्रीमहोदय श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयातून करण्यात आला. या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे याचबरोबर दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विभागीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, उपायुक्त (विकास), जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागात ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून विविध ग्रामीण आवास योजनांमधून शासन बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरविण्यात यशस्वी होत आहे. याचाच भाग म्हणून दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबविलेल्या महा आवास अभियान – ग्रामीण (टप्पा-१) मध्ये १२६० पेक्षा जास्त बहुमजली इमारती, ६३० पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच ७५० घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर ५० हजार ११२ भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या टप्पा-१ मध्ये आपण ४ लाख २५ हजार घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहे. महाआवास अभियान टप्पा-२ हा २० नोव्हेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत असून हे अभियान अधिक गतिमानतेने आणि गुणवत्तेने राबविण्यात येणार असल्याचे मंत्रीमहोदयांनी सांगितले.

दृरदूष्यप्रणालीद्वारे राज्यमंत्री श्री.सत्तार म्हणाले की, बेघर व्यक्तींना घरे देण्यात काही अडचणी येत असेल, त्यांच्या घरांकरिता रेती, वाळू, आदी साहित्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असतील, तर त्या शासन स्तरावर तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या घरांकरिता काही रक्कम केंद्र सरकारकडून मिळत असून ती रक्कम मिळण्यास अडचणी असल्यास त्याही प्राधान्याने सोडविल्या जातील. या महाआवास अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची कल्पना अतिशय उत्तम असल्याचे श्री.सत्तार यांनी यावेळी सांगितले.

अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार म्हणाले की, महाआवास अभियान टप्पा-१ मध्ये संस्था आणि व्यक्तींनी खूप चांगले काम केले आहे. राज्यातील गरीबांकरिता बांधण्यात येणाऱ्या घरांचा बांधकाम कालावधी हा आज १ वर्षाचा असून तो निश्चितच आणखी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी आय.आय.टी. मुंबईच्या मदतीने राज्यातील १ हजार ३०० ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची तांत्रिकदृष्ट्या क्षमता बांधणी केली असल्याचाही या अभियानाकरिता निश्चितच उपयोग होणार असल्याचेही राजेशकुमार म्हणाले.

ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.दिघे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना इत्यादी ग्रामीण गृहनिर्माण योजनांबरोबर जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करून देणे आदींबाबत सर्व शासकीय यंत्रणांनी खूप चांगले काम केले आहे. आता महा आवास अभियान टप्पा-२ हा अधिक गतिमान करण्यात येणार असल्याचे श्री.दिघे यांनी सांगितले.

याप्रसंगी मंत्रीमहोदय यांच्या हस्ते महाआवास अभियान-ग्रामीण २०२१-२२ च्या घडीपुस्तिका तसेच पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणच्या महाआवास हेल्पलाईन १८०० २२ २०१९ या टोल फ्री क्रमांकही सगळ्यांसाठी खुला करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *