मुंबई, दि. ३० : नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
मौजे वाडी गावाचे हद्दीतील पुनर्वसन कोरड्या पोसली नदीच्या पात्रात, ता. शहादा (जि. नंदूरबार) या ठिकाणी दारुबंदी कायद्यांतर्गत छापा टाकून केलेल्या गुन्हा अन्वेषण कारवाईमध्ये मध्य प्रदेश राज्यात निर्मिती केलेल्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या बिअरचे एकूण ४५० बॉक्स व एक भ्रमणध्वनी संच तसेच ०३ मालवाहक वाहने असा एकूण रुपये ३५,५५,०००/- इतक्या किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणी अवैध बिअर साठा खरेदीदार आरोपीत मगन दखन्या वसावे, वय ३५ वर्ष रा. मु. पो. जिवन नगर, वाडीपूर, कुडावत जावदा, ता. शहादा (जि. नंदूरबार) यास अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे.
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई या भरारी पथकाने २८.११.२०२१ रोजी मिळालेल्या माहितीनुसार मौजे वाडी गावाचे हद्दीतील पुर्नवसन कोरड्या पोसली नदीच्या पात्रात, ता. शहादा (जि. नंदुरबार) या ठिकाणी छापा टाकला. पहाटेच्या सुमारास एका चॉकलेटी रंगाच्या आयशर कंपनीच्या ट्रक क्र. MH-I8-AA-0204 मधून फक्त मध्य प्रदेश राज्यातच विक्रीकरिता निर्मिती केलेल्या परंतु, महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेल्या अवैध बिअर साठ्याची विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या आयात केली जाणार असून तो साठा दुसऱ्या एका आशयर कंपनीच्या डंपर क्र. GJ-34-T-1317 व एका महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप क्र. MH-04-HD-5710 या दोन वाहनांमधून महाराष्ट्र राज्यातील विविध भागात वितरित केला जाणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती.
याच पथकामार्फत नोंदविलेल्या गुन्हा रजि. क्र. ३८१/२०२९ दि. १३.११.२०२१ नुसार मौजे मामाचे मोहिदा शिवारातील, नवीन तहसिल कार्यालयाच्या समोरील रोडवर, ता. शहादा (जि. नंदूरबार) या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये ०२ आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले व मध्यप्रदेश निर्मित अवैध बिअरचे ५२० बॉक्ससह एक टेम्पो असा एकूण रु. २९,४५,६००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एकाच महिन्यात शहादा, नंदूरबार येथे केलेल्या सलग दोन कारवायांमध्ये एकूण ०३ आरोपींच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या व मध्य प्रदेश राज्यात विक्रीकरिता निर्मिती केलेल्या अवैध बिअरचे ९७० बॉक्स जप्त करण्यात आले असून एकूण ०४ वाहनांसह रु.५७,००,६००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवाया श्री. कांतिलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशानुसार व श्री. सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त, कोकण विभाग, ठाणे व श्रीमती उषा वर्मा, संचालक (अ.ब.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदूरबार व त्यांचे कर्मचारी यांचे कारवाईवेळी सहकार्य लाभले.
या गुन्ह्याची फिर्याद श्री. विशाल बस्ताव, जवान बक्कल क्र. २६४ यांनी दिली असून पुढील तपास श्री. मनोज चव्हाण, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक मुंबई हे करत आहेत.
अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्रि क्रमांक १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००९१३३ तसेच दूरध्वनी क्र. ०२२-२२६३८८१ वर संपर्क साधावा, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.