पर्यावरणाचे जतन, संवर्धन केले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्यासाठी आपली वसुंधरा जपली पाहिजे. आपली वसुंधरा ही संपन्न असावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘माझी वसुंधरा अभियान’ 2 ऑक्टोबर 2020 पासून सुरु केले. या अभियानाचा दुसरा टप्पा पर्यावरण दिनी म्हणजेच 5 जून पासून सुरु झाला. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित असलेले ‘माझी वसुंधरा अभियान’ पुणे महसूल विभागातील सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे या पाच जिल्हयात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनात दमदारपणे राबविले जात आहे. त्यावर आधारित लेख…
|
सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन गरजांशी निगडित असे हे अभियान आहे. कारण यात जी पंचतत्त्वे अंगीकारली आहेत, ती आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी आहेत. अगदी यातील प्रत्येक तत्त्वांबाबत विचार केला असता असे लक्षात येते की…
पृथ्वी तत्त्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. वायू तत्त्वाचे संवर्धन करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदूषण कमी करुन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे यासाठी जनतेला सायकल वापराबाबत प्रोत्साहित करणे. त्यासाठी सायकल रॅली, कार्यालयात वाहन विरहित दिवस निश्चित करून सायकलचा वापर करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जलतत्त्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण याचा समावेश आहे. अग्नी तत्त्वाशी संबंधित उर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, अपारंपारिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतांचे बांध यासारख्या जागांवर राबवणे आणि आकाश या तत्त्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करुन मानवी स्वभावांतील बदलासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमातून जनमानसात बिंबवणे या प्रमुख बाबींचा समावेश या अभियानात करण्यात आला आहे.
निसर्गपूरक जीवनपद्धती
निसर्गाच्या या पंचतत्त्वासोबत जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करुन निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अमृत शहरांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, सातारा नगरपरिषद, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपरिषद, सोलापूर महानगरपालिका व बार्शी नगरपरिषद यांचा समावेश होता. तर राज्यातील 226 नगरपरिषदांपैकी पुणे विभागातील पुणे- 13, सातारा-7, कोल्हापूर-10,सांगली-6 आणि सोलापूर-9 अशा एकूण 45 नगरपरिषदांचा समावेश आहे. 126 नगरपंचायतीपैकी पुणे विभागातील 18 आणि 246 ग्रामपंचायतीपैकी पुणे विभागातील 93 ग्रामपंचायती समाविष्ट आहेत.
पहिल्या टप्प्यात अडीच लाख वृक्ष लागवड
पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 92 हजार, पुणे महानगरपालिकेत 18 हजार 446, आळंदी 1 हजार 236, बारामती 13 हजार, भोर 1 हजार 250, चाकण 1 हजार 500, दौंड 1 हजार 519, इंदापूर 2 हजार 821, जेजुरी 984, जुन्नर 975,लोणावळा 5 हजार 200, राजगुरुनगर 190, सासवड 1 हजार, शिरुर 3 हजार 480, तळेगाव दाभाडे 4 हजार 874,वडगाव मावळ 2 हजार 330, मालेगाव 250 तर देहू 150 इतकी वृक्षलागवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात दहिवडी येथे 1 हजार 500, कराड 3 हजार, खंडाळा 2 हजार, कोरेगाव 500, लोणंद 500, महाबळेश्वर 2 हजार 100, मलकापूर 250, मेढा 250, म्हसवड 2 हजार, पाचगणी 2 हजार 800, पाटण 550, फलटण 2 हजार 100, रहिमतपूर 4 हजार 500, सातारा 6 हजार 950, वडूज 248 तर वाई 100 याप्रमाणे वृक्षलागवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हयात महानगरपालिका क्षेत्रात 13 हजार 399,
बार्शी 10 हजार, अक्कलकोट 8 हजार, दुधानी 750, करमाळा 700, कुर्डूवाडी 600,मैंदर्गी 2 हजार 221, मंगळवेढा 780, मोहोळ 2 हजार 500, पंढरपूर 8 हजार, सांगोला 1 हजार 150,माढा 1 हजार, माळशिरस 750, वैराग 1 हजार 200, महाळूंगे श्रीपूर 250 इतकी झाडे लावण्यात आली आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 3 हजार 758, आजरा 120, हुपरी 280, शिरोळ 200,गडहिंग्लज 1 हजार 500, इचलकरंजी 1 हजार 800, कुरुंदवाड 200, पन्हाळा 1 हजार 800, मलकापूर 500 तर जयसिंगपूर 2 हजार 600 इतकी झाडे लावण्यात आली आहेत. सांगली जिल्हयात सांगली-मिरज-कूपवाड मध्ये 890, आष्टा 1 हजार 100, जत 300, पलूस 695, तासगाव 480, उरण इस्लामपूर 1 हजार 230, विटा 1 हजार 550, कडेगाव 700, कवठेमहाकाळ 1 हजार 15, खानापूर 950 तर शिराळा येथे 2 हजार इतकी वृक्षलागवड करण्यात आली.
दुसऱ्या टप्प्यातील वैशिष्ट्ये
अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अमृत शहरे-8, नगरपरिषदा-47, नगरपंचायती-22 तसेच 10 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 104 ग्रामपंचायती तर 10 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 5 हजार 38 ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या आहेत. म्हणजेच दुस-या टप्प्यात पुणे विभागातील 77 शहरी तर 5 हजार 142 ग्रामीण स्थानिक संस्थांची नोंदणी झाली आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत 10 पट पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांची नोंदणी झाली आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत 10 पट पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांची नोंदणी दुसऱ्या टप्प्यात झाली आहे. कोरोनासारख्या भयानक संकटकाळातही अभियानाच्या दुस-या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नोंदणीमध्ये झालेली वाढ हे या अभियानाच्या यशस्वीतेचे द्योतक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वृक्षगणना, रोपवाटिकेची निर्मिती, वृक्ष आराखडा, एकल वापर प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, ई-कचरा व्यवस्थापन, वायू तत्त्वाशी निगडीत फटाक्यांवर बंदी घालण्याच्या दिशेने पुढाकार, राडारोडा कचऱ्याचे व्यवस्थापन, कृषी कचरा व्यवस्थापन, उज्ज्वला योजना आणि गॅस जोडणी, सायकलिंग करीता मार्ग निर्मिती, इलेक्ट्रीक वाहन धोरण 2021 ची प्रभावी अंमलबजावणी, जल तत्त्वाशी निगडीत पाण्याचे लेखापरीक्षण अहवाल, सार्वजनिक इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग,विहीर पुर्नस्थापना उपक्रम, सूक्ष्म प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेतजमिनीची टक्केवारी, प्रक्रिया करण्यात आलेल्या पाण्याचा पुनर्वापर, सणांच्यावेळी जलप्रदूषण कमी करणे, पर्यावरणपूरक मूर्तीचा प्रचार. अग्नी तत्त्वांतर्गत सार्वजनिक इमारतींच्या छतावर सौर स्थापना व सार्वजनिक इमारतींचे एनर्जी ऑडिट करणे. आकाश तत्त्वानुसार माझी वसुंधरा अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्पर्धा आयोजित करणे, यशोगाथा तयार करणे इत्यादी वैशिष्टयांचा समावेश आहे.
या अभियानात विभागातील सर्व संबंधित संस्था मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या दूरदृष्यप्रणाली वरील बैठकीमध्ये आला. विभागातील सर्वच संस्था त्यांच्या त्यांच्यापरीने उत्तमोत्तम काम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एकूणच हे अभियान यशस्वीतेसाठी पुणे विभाग सज्ज झाला आहे.
डॉ.राजू पाटोदकर
उपसंचालक (माहिती), पुणे विभाग, पुणे