लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करा मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या सूचना, व्हीसीद्वारे घेतला आढावा

मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधून कोविड परिस्थितीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

बैठकीच्या सुरवातीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी कोविड१९ विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या हाय रिस्क देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात येत आहे. त्यापैकी ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे, अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतरही संबंधित रुग्णांवर लक्ष ठेवण्यात यावे. तसेच काँटैक्ट ट्रेसिंग अतिशय बारकाईने करावे. चाचणीसाठी आवश्यक असणारी टेस्टिंग किट्स एनएचएमच्या निधीतून खरेदी करावी, असे सांगितले.

मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी कोविडमुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तत्काळ मदत मिळेल यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. कोविडने निधन झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांशी संपर्क साधावा. याबाबत प्रसिद्धी करावी. पोर्टल वर आलेल्या अर्जांची छाननी करण्याची कार्यवाही गतीने करावी, अशा सूचना दिल्या.

वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करण्याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. मिशन ऑक्सिजननुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प पूर्ण करुन घ्यावेत. यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. अनबलगन, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, स्टेट मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, सिडकोचे सह कार्यकारी संचालक अश्विन मुदगल, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंह, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महात्मा फुले आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *