राज्यात सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या आयटी पार्कचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते भूमीपूजन

नवी मुंबई, १९ : पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या टाटा रिॲलिटीच्या ‘इंटेलियन’ आयटी पार्कचे भूमिपूजन आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे राज्यात ५००० कोटी रुपयांची थेट गुंतवणूक येणार असून सुमारे सत्तर हजार जणांना नोकरीची संधी मिळेल, असा विश्वास श्री.देसाई यांनी व्यक्त केला.

यावेळी टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय दत्त,  अशोक सुभेदार, ॲक्टिस इंडियाचे भागिदार आशिष सिंग, बिझनेस हेड अभिजीत माहेश्वरी, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी विविध धोरणे आखली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आयटी, आयटीएस धोरणामुळे राज्यात सर्वाधिक डेटा सेंटर्स सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रमाण एैंशी टक्क्यांवर जाईल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

राज्यात गुंतवणुकीला ओघ वाढत आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही इतर राज्यात जात नाही, आम्ही दुबई, युरोप सारख्या देशांत जातो. कोरोना काळात आम्ही सुमारे दोन लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित केली.

असे असेल इंटेलियन पार्क

नवी मुंबईत सुमारे ४७ एकर क्षेत्रावर इंटेलियन पार्क उभारले जाणार आहे. या ठिकाणी आयटी, व्यापारी केंद्र, डेटा सेंटर विकास केंद्र असेल. नवी मुंबईतील घणसोली स्टेशनसमोर हे इंटेलियन पार्क  असेल. सुमारे ४७.१ एकर व सत्तर हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर हे पार्क असेल. यामुळे नवी मुंबई परिसराचा कायापालट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *