सर्वांना सकस व निर्भेळ अन्न मिळावे – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
मुंबई, दि. २२ : सर्वांना सकस आणि निर्भेळ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सातत्याने काम करण्यात येत असते. याचाच भाग म्हणून मंत्रालय प्रांगणात ‘इट राईट’ या केंद्र शासन पुरस्कृत अभियानाची माहिती देणाऱ्या माहिती फलकाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.
संपूर्ण पोषक द्रव्ये मिळावीत यासाठी फोर्टीफाईड तांदूळ व इतर अन्नघटक आहारात असावेत त्याचप्रमाणे तेल, साखर आणि मीठ याचा कमीत कमी वापर आपल्या आहारातून व्हावा असा संदेश देणारे हे फलक आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे मिठाई विक्रेत्यांवर नियमित लक्ष ठेवले जाते. मिठाईच्या वेष्टनावर उत्पादन दिनांक टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नेहमी व सणासुदीच्या काळातही ग्राहकांना भेसळमुक्त खवा, दुध, दुग्धजन्य पदार्थ मिळावेत यासाठी विशेष दक्षता घेण्यात येते. भेसळयुक्त तेल, बाहेरील राज्यातून आलेला गुटखा, यासारख्या वस्तू छापे टाकून मोठ्या प्रमाणात जप्त करण्याची कारवाई सातत्याने विभागामार्फत होत असते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या निमित्ताने दिली.