नयनरम्य दिव्यांनी उजळला कृष्णा नदीचा माई घाट पाणी पूजनाने झाली नदी उत्सवाची सांगता

सांगली, दि.२४ : जलसंपदा विभागा मार्फत १७ ते २३ डिसेंबर या कालावधीत कृष्णा नदी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज या उत्सवाची सांगता झाली. कृष्णा नदीच्या काठावरील माई घाटावर जलसंपदा विभागाने केवळ दहा मिनिटात पाच हजार दिवे लावून माई घाट दिव्यांनी उजळविला. नयनरम्य अशा या दिव्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे शब्द साकारले.

कृष्णा नदी उत्सवाच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलींद नाईक व कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, सचिन पवार,  सुर्यकांत नलवडे, अभिनंदन हरुगडे, राजन डवरी, महेश रासनकर, अधीक्षक जालिंदर महाडीक व जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सांगलीकर नागरीक उपस्थित होते.

कृष्णा काठी माईघाटावर सुर्यास्तानंतर नयनरम्य अश्या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ५ हजार दिव्यांची मनमोहक अशी आरास करण्यात आली. भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अशी अक्षरे व माई घाटाचा परिसर दिव्यांनी उजळून निघाला. या कार्यक्रम प्रसंगी अधीक्षक अभियंता मिलींद नाईक व कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्याहस्ते चित्रकला स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विजेत्यांना व सहभागी झालेल्या स्पर्धकांना बक्षिस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच लहान मुलांच्या हस्ते तिरंगा रंगातील फुगे आकाशात सोडण्यात आले. यानंतर कृष्णा माईचे पाणी पुजन करून महाआरती करण्यात आली.

कृष्णा नदी उत्सवांतर्गत दि. १७ व १८ डिसेंबर रोजी सर्व घाटाची स्वच्छता मोहिम, दि. १९ व २० डिसेंबर रोजी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन, दि. २१ डिसेंबर रोजी निसर्ग व पर्यावरण वृक्षारोपन कार्यक्रम व संबंधी ५ ते १५ वयोगटातील मुलांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी भजन, भक्ती गीत, भावगीत व गीतरामायण अशा सुगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी उपस्थितांचे आभार मानुन कृष्णा नदी उत्सवाची सांगता केली.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *