महाविकास आघाडी कायमस्वरूपी नाही, केवळ 5 वर्षांसाठी-नाना पटोले

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी कायमस्वरूपी झालेली नाही राज्यात पाच वर्षांसाठी तिन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे, असं विधान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या ऑनलाईन या भव्यशाली सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेला टोले लगावले होते. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कुणी कितीही स्वबळाची नारा दिला तरी एक दुसऱ्याची सांगड घातल्याशिवाय सरकार उभारू शकत नाही. काँग्रेससोबत भाजपनंही स्वबळाचा नारा दिला आहे. याआधीही भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे यात काहीच गैर नाही,” असंही नाना पटोले म्हणाले.

पक्षाची ताकद वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, असं सांगताना नाना पटोले यांनी पुढे म्हटलं, “कोरोना काळात जनतेला मदत करण्याला काँग्रेस पक्षानं नेहमीच प्राधान्य दिलं आहे. मग ते रक्तदान असो, ऑक्सिजन असो किंवा मग प्लाझ्मा, कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठी मदत केली आहे.”

स्वबळापेक्षा कोरोनाच्या स्थितीकडे लक्ष देणं महत्त्वाचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते, त्या वक्तव्याला नाना पटोलेंचं हे उत्तर मानलं जात आहे.