कोरोना व सामाजिक अर्थसहाय्य योजनावरील चित्ररथाला प्रारंभ

नागपूर,दि. १९  जिल्हा माहिती कार्यालय नागपूरद्वारा कोरोना जनजागृती व सामाजिक अर्थसहाय्य योजनावरील चित्ररथाला मंगळवारी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या चित्ररथामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, जिल्हाधिकारी आर.विमला यांचा कोरोनाविषयक जनजागृतीचा संदेश महानगर व जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. यासोबतच सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा देखील प्रसार या माध्यमातून केला जाणार आहे.

जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेची सुसज्जता तसेच कोविड पासून अलिप्त राहण्यासाठी जनतेने राबवायचा प्रतिबांधत्मक उपाययोजने संदर्भात जनजागृती करण्यासाठी पालकमंत्र्यांनी विडिओ संदेश दिला आहे. येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असून १०० टक्के लसीकरण हाच त्यावर रामबाण उपाय आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या ज्येष्ठांसाठी बुस्टर डोस मोहीम राबविली जात आहे. याशिवाय १५ ते १८ वयोगटातील तरुणांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु आहे. या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. कोणतीही बेपरवाई न करता मास्क वापरणे याची सवय नागरीकांनी लावावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या चित्ररथासोबत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा माहिती पुस्तिकेचे वितरण केले जाणार आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना याची माहिती वितरित केली जात आहे.

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी यावेळी चित्ररथाच्या विषयाला व वितरण व्यवस्थेला जाणून घेतले. ग्रामीण व शहरी भागातील गरजू व्यक्तीपर्यंत योजनांची माहिती पोहचणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांचासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *