मानवतेच्या मूल्याशी अधिक कटिबद्ध होऊया – पालकमंत्री अशोक चव्हाण

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  • आरोग्याच्या सेवेसाठी नाविन्यपूर्ण योजनांचा जिल्ह्यात प्रभावी वापर
  • कृषी पंप विज जोडणी धोरणाचा शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ

नांदेड प्रतिनिधी, दि. २७ :- स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व घटना समितीतील सदस्यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेचा पाया मजबूत केला आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात हजारो जाती, जमाती, अनेक धर्म, पंथ गुण्यागोविंदाने अनादी काळापासून एकत्र राहत आले आहेत. आपल्या संस्कृतीतील मानवतेचे जे मूल्य आहे तेच भारतीय राज्यघटनेने व्यापक प्रमाणात अधोरेखीत केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. जयश्री पावडे, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, स्वातंत्र्य सैनिक व निमंत्रीत नागरिक उपस्थित होते. यावेळी  पालकमंत्रयांच्या हस्ते उल्लेखनिय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्या बद्दल पोलिस उपनिरिक्षक मिर्झा अनवर बेग यांचा सत्कार करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्यातील मानवतेचे मूल्य इथल्या जनमाणसात रुजल्याने विकासाच्या प्रक्रियेला लोकसहभागाचे अधिष्ठान आपण देऊन शकलो हे आपल्या प्रजासत्ताकाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ज्या ठिकाणी लोकसहभाग अधिक भक्कम असल्याचे आपण पाहतो, त्याठिकाणी विकासाची व्याप्ती ही मोठी असते. विकासाची ही संकल्पना अधिक भक्कम करण्याचे कार्य महाविकास आघाडी शासन करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी “जय जवान जय किसान” हा नारा दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी दिला. यातून  शेतकऱ्यांच्या मनात मोठा विश्वास निर्माण झाला. कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्रांती तर स्व. शंकरराव चव्हाण यांनी जलक्रांतीसाठी दिलेल्या योगदानाने कोरडवाहू क्षेत्रालाही हक्काचे पाणी मिळू शकले. असंख्य योजना ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे राबविल्या जात आहेत. काळानुरूप या योजनांमध्ये बदल करून त्याला नवतंत्रज्ञानाची जोडही दिली आहे. शेतीसमवेत ग्रामीण भागात शिक्षणाच्या सेवा-सुविधाही अधिक भक्कम कशा होतील याचे नियोजन आपण करीत असल्याचे ते म्हणाले.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा अधिक विचार करून “कृषी पंप विज जोडणी धोरण २०२०” ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत कृषी पंप वीज ग्राहकांना तात्काळ वीज कनेक्शन देणे आणि दिवसा वीज पुरवठा करणे नियोजित आहे. या योजनेत संपूर्ण विलंब आकार माफ करून वीज बिलात ६६ टक्के पर्यंत वीजबिल माफीची सवलत देण्यात आलेली आहे. या योजनेमधून  शेतकऱ्यांचे वीज बिल कोरे करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. या योजनेत नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

आरोग्याच्या या संकटाशी सामना करतांना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत व सेवा-सुविधेत कोणतीही कमतरता पडणार नाही याची खबरदारी आपण घेतली. श्री गुरू गोबिंद सिंघजी शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये अद्ययावत सिटी स्कॅन मशीन, अद्ययावत कोविड-१९ वार्ड, नांदेड जिल्ह्यात १४ मॉड्युलर ऑपरेशन थेअटर, जिल्ह्यातील सर्व भागांना आरोग्य सुविधेशी जुळता यावे या उद्देशाने ६२ नवीन रुग्णवाहिकांची खरेदी, प्रत्येक तालुक्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता एक्सरे मशीन्स, महिला रुग्णालय येथे अद्ययावत सोनोग्राफी कक्ष, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे अद्ययावत कोविड अतिदक्षता बालरोग कक्ष, मिशन स्वास्थ अंतर्गत क्रीडा सुविधांवर भर, नाविन्यपूर्ण योजना व लोकसहभागातून महसूल कॉलनी येथे ३ सिंथेटिक टेनिस कोर्ट, जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्याधुनिक ३ बॅडमिंटन कोर्ट, जिल्ह्यात शासकीय कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खुल्या जागेत ओपन जीम, नांदेड क्लब येथे हेरीटेज रोड, पाच नगरपरिषदांकरीता अत्याधुनिक अग्निशमन वाहन, जिल्ह्यातील रुग्णालय, मनपा व नगरपरिषदांमध्ये विकेंद्रीत मलनिस्सारण केंद्राची उभारणी, नियोजन भवन येथे विविध बैठका, परिषदा यादृष्टिने व्हिडिओ कॉन्फरन्सकरीता डिजिटल एलईडी डिस्पले, सहस्त्रकुंड येथे मेगा ॲडव्हेन्चर स्पोर्ट यावर आपण भर दिला असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या समृद्धी महामार्गापासून नांदेड व शेजारी जिल्ह्यातील काही भाग वंचित राहत असल्याची बाब मी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. या महामार्गाला जोडण्यासाठी नांदेड ते जालना पर्यंतच्या नव्या महामार्गाच्या कामाला त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत मंजूरी दिली. या महामार्गाचे काम येत्या दोन वर्षात युद्ध पातळीवर पुर्ण करता यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  यांच्या भूसंपादनासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यावरील होणाऱ्या पुलांची कामे अत्याधुनिक पद्धतीने व्हावेत, सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर कसा करता येईल यावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेडच्या प्रशासकीय कामासाठी जे एकत्रित संकुल अत्यावश्यक आहे, त्याचेही नियोजन आम्ही केले आहे. कौठा येथील सुमारे १०० एकर जागेवर हे संपूर्ण प्रशासकीय संकुल एकाच भागात आकारास येणार  असल्याने नागरिकांनाही आता ते अधिक सोयीचे होईल.  नांदेड शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुमारे ७०० कोटी निधीची तरतूद केली असून या कामाचा शुभारंभही केल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

यावेळी परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *