मुंबई, दि. ३१ :- महात्मा गांधी यांच्याकडे केवळ व्यक्ती म्हणून पाहता येणार नाही, त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असून जगभर ते प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि करिअर कौन्सिलर आशुतोष शिर्के यांनी केले. अहिंसा, प्रेम, सहिष्णुता आणि सत्याग्रहाचे गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महात्मा गांधी यांचे जीवन आणि विचार’ या विषयावर श्री.केतकर आणि श्री.शिर्के यांच्या व्याख्यानाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या.
खासदार कुमार केतकर म्हणाले, महात्मा गांधी ही विचारधारा आहे. त्यांच्या विचारांचे अनुयायी जगभर आढळतात. अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग पासून बराक ओबामा तसेच रशियाच्या गोर्बाचेव्ह पर्यंत महासत्तांचे राष्ट्राध्यक्ष देखील गांधीजींच्या विचारांपासून प्रेरणा घेत असत. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ मौन पाळून थांबता येणार नाही, तर गांधीजींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. शस्त्रास्त्रे ही केवळ विध्वंस करू शकतात असा विचार मांडणाऱ्या गांधीजींनी अहिंसेचा मार्ग स्वीकारून सत्याग्रहाच्या मार्गाने त्याचा प्रसार केला. सर्वांना सुख समाधानाने जगायचे असेल तर सर्वांना अहिंसेच्या मार्गानेच जावे लागेल, या त्यांच्या विचाराने जगभर प्रेरित झालेले अनेकजण आजही त्यांचा विचारांचा प्रसार करताना आढळतात.
श्री.केतकर म्हणाले, साधे राहणीमान असणाऱ्या आणि मर्यादित भाषा जाणणाऱ्या गांधीजींचे विचार काश्मिर पासून तामिळनाडूपर्यंत पोहोचत होते. मराठी येत नसतानाही त्यांच्या विचारांचा पगडा महाराष्ट्रातही होता. विनोबा भावे हे गांधी विचारांचा प्रसार त्यांच्या आश्रमातून करत. सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता हे बिरूद पहिल्यांदा लावले. गांधीजी सर्व धर्म समभाव मानणारे, श्रमाला महत्त्व देणारे होते. त्याच विचाराने भारत देश सर्वधर्मसमावेशक राष्ट्र बनला. गांधीजींच्या विचारांमुळे संस्थाने वेगवेगळी स्वतंत्र न होता भारत एकसंघ राहून एकात्मता टिकून राहिली.
अमेरिका आणि रशिया महासत्ता झाले आणि जगात दोन गट तयार झाले. तथापि, सर्व जग एक असावे अशा विचारांमुळे पंतप्रधान पं.नेहरूंच्या पुढाकाराने अलिप्त राष्ट्रांची संघटना स्थापन झाली. यात पुढे १६९ देश सहभागी झाले. याद्वारे गांधीजींचा विचारच नेहरूंनी पुढे नेल्याचे श्री.केतकर यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रामध्ये लोकांच्या सहकार्याने अनेक कंपन्या उभ्या करून नेहरूंनी आत्मनिर्भर होण्याकडे पावले उचलली. पुढे इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून खेड्यापाड्यांपर्यंत बँका पोहोचविल्या आणि शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचवायला सुरूवात केली. त्यांच्या आर्थिंक विकासाच्या धोरणांमुळे देश खऱ्या अर्थाने प्रगती करू लागल्याचे त्यांनी सांगितले.
आशुतोष शिर्के यांनी विद्यार्थ्यांना पुढे जी आव्हाने येतील, समस्या येतील याचा शोध घेण्याचा आणि त्यावर मात करून मार्गक्रमण करण्याचा शिक्षणाचा उद्देश असल्याचे सांगितले. आताचे विद्यार्थी जेव्हा उद्याचे नागरिक बनतील तेव्हा त्यांच्यापुढे ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणाचा ऱ्हास ही महत्त्वाची समस्या उद्भवणार असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या रॉब ग्रीनफिल्ड, सुनिता नारायण, स्व.राजेंद्र पचौरी, लॉरी बेकर, अल गोर आदींची उदाहरणे देऊन या सर्वांमध्ये गांधीजींचे विचार हा दुवा होता. या मंडळींनी जेव्हा काम करायला सुरूवात केली तेव्हा त्यांना कुठल्यातरी वळणावर गांधीजींचा विचार भेटला, गांधीजींचे विचार त्यांचे प्रेरणास्त्रोत होते, असे ते म्हणाले.
श्री.शिर्के म्हणाले, जगभरात अनेक ठिकाणी अनेक बाबींची अती उपलब्धता आहे तर काही ठिकाणी काहीच मिळत नाही. अशा प्रश्नांवर काम करणाऱ्यांपैकी बांग्लादेशच्या मुहम्मद युनुस सारख्यांमध्ये गांधी विचार आवर्जून पुढे येतो. हिंसा, कलह आदींचा विचार करता मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, बराक ओबामा, जुआन सँटोस यांनी देखिल गांधींचा विचार स्वीकारावा लागेल, असेच सांगितले. सामाजिक न्यायासाठीची चळवळ उभारणारे सीझर शावेझ यांनाही गांधी नावाचा मार्गदर्शक भेटतो. या पार्श्वभूमीवर आज विद्यार्थी, पालक, शिक्षक म्हणून आपण काय करू शकतो, हा विचार करण्याची आवश्यकता असून अहिंसा, प्रेम, सहिष्णुता, सत्याग्रह हे विचार अंगिकारण्याची आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्नांची गरज त्यांनी प्रतिपादित केली. आज जे असत्य आपल्याभोवती येते त्यातील फेक न्यूज कशी ओळखायची हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी शाळाशाळांमधून राबवला जावा, असे आवाहन त्यांनी केले. शालेय शिक्षण विभाग गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याचा स्तुत्य प्रयत्न करीत असल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी महात्मा गांधीजींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी ते विचार अंगिकारावेत, असे आवाहन केले.
करवीर तालुक्यातील विद्या मंदिरच्या राहूल भोसले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या आवडीचे भजन सादर केले. विकास गरड यांनी व्याख्यानमालेचे सूत्रसंचलन केले.