कराड येथील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा

सातारा, दि.१: शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ३ लक्ष, सह संचालक यांना ५ लक्ष आणि संचालक यांना १० लक्ष रुपये मर्यादेपर्यंत वैयक्तिक लेखा ( Personal and Ledger Accounts ) खात्यातून  खर्च करण्यास परवानगी देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

कराड येथील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा घेतला. यावेळी  पुणे येथील तंत्रशिक्षण विभागाचे सह संचालक दत्तात्रय जाधव, प्राचार्य डॉ. अशोक पिसे, अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल देशपांडे, विभाग प्रमुख डॉ. अनिल आचार्य, डॉ. सुनिल पाटील, डॉ. प्रसाद जोशी यांच्यासह संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.

यावेळी श्री. सामंत म्हणाले, शासकीय महाविद्यालयात  विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षण दिले जाते. या महाविद्यालयातील स्वच्छता ठेवण्याचे काम वर्ग ४ व स्वच्छता कर्मचारी करीत असतात त्यामुळे करारावर घेण्यात आलेले वर्ग ४ चे कर्मचारी व स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी यांना किमान वेतन द्या. याचा प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या  मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयाला रुसा मधून भरीव मदत केली जाईल. प्राध्यापकाच्या रिक्त पदाबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला  कळविले आहे.

या महाविद्यालयात रत्नागिरी व औरंगाबादच्या धर्तीवर इनोवेशन सेंटरसाठी मंजूरी दिली जाईल. त्याचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा.  यासाठी ५ कोटींचा निधी  मार्च २०२२ नंतर दिला जाईल. नवीन उपक्रमांतर्गत संगणक शास्त्र अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुढच्या वर्षापासून सुरु केला जाईल.

या वर्षीपासून युवा महोत्सव व क्रीडा स्पर्धांचे आयोजन  करण्यात यावे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे निधी देण्यात येणार असून त्याची तयारी आत्तापासूनच करा.

या तिन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच  प्राचार्यांचे तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण होईल यासाठी शिबीरांचे आयोजन करावे. अशा सूचनाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *