ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांच्या वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती

२७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असणाऱ्या यंत्रमागधारकांना दिलासा

मुंबई, दि. ०८ – वीज सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांची वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती देण्यात आली आहे.  यंत्रमागधारकांची थांबविण्यात आलेली वीजसवलत पूर्ववत करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी रविवारी, इचलकरंजी येथील संवाद सभेत यंत्रमागधारकांची वीजबिल सवलत पूर्ववत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत आज वस्त्रोद्योग आयुक्तांना वीज बिल सवलत पूर्ववत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज प्रणाली सुलभ करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याबरोबरच यंत्रमागधारकांकडून सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

२२ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असणाऱ्या यंत्रमागधारकांना वीज बिल सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. २९ डिसेंबर २०२१ रोजी वस्त्रोद्योग आयुक्तांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून ऑनलाईन नोंदणी न केलेल्या २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांची वीज सवलत बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या.  वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती देण्यात येत असल्याच्या लेखी सूचना वस्त्रोद्योग विभागाने आज वस्त्रोद्योग आयुक्तांना कळविल्या आहेत. आता वीजसवलत पूर्ववत सुरू झाल्याच्या निर्णयामुळे राज्यभरातील यंत्रमागधारकांना  मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *