साखर संकुल येथे कृषी मंत्री श्री. भुसे यांनी भौगोलिक मानांकनाबाबत आढावा घेतला. यावेळी कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसचिव गणेश पाटील, फलोत्पादन संचालक कैलास मोते, पणन संचालक सुनील पवार, संचालक सुभाष नागरे यांच्यासह जीआय मानांकन प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. भुसे म्हणाले, राज्यातील २२ पिकांना २६ मानांकन मिळाले आहेत. १० नवीन वाण मानांकनासाठी प्रस्तावित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात विकेल ते पिकेल अंतर्गत मागणी असलेला वाण शेतकऱ्यांनी पिकवावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. जीआय भौगोलिक मानांकन प्राप्त वाणांना शासनाचे पाठबळ असणार आहे. शेतकरी बांधवांनी सुचविलेल्या काही उपाययोजनावरही लववकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
जीआय मानांकन मिळालेल्या वाणांचे आता ब्रॅडींग करण्यात येणार आहे. राज्य सरकारने भोगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळालेल्या कृषी उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नोंदणी, प्रचार, प्रसिद्धी व बाजारपेठ उपलब्धता अशा चार योजना तयार केल्याने त्याचा फायदा ब्रॅडींगला होणार आहे. राज्यातील अनेकांना भोगोलिक मानांकन मिळाले आहेत. या उत्पादकांच्या अधिक उत्पादनांसाठी, तसेच या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यामध्ये कृषि विभाग, पणन व अपेडा अंतर्गत कृषि उत्पादकांना मदत करण्यात येणार असल्याचेही श्री. भुसे यांनी सांगितले.
फलोत्पादन संचालक श्री. मोते यांनी राज्यातील भौगोलिक मानांकनाबाबत तर पणन संचालक श्री.पवार यांनी पणम मंडळाच्या योजनाबाबत सादरीकरण केले. राज्यातील जीआय मानांकन मिळालेल्या उत्पादक संघाचे अध्यक्षांनी संघाच्यावतीने सुरू असलेले काम, अडचणी व उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी कृषी, पणन, अपेडा विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.