बीड प्रतिनिधी, दि.०८ :- बीड जिल्ह्यातील देवस्थान व वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदी-विक्री अपहार प्रकरणी एकूण ५ गुन्हे दाखल झाले असून या ५ गुन्ह्यांपैकी ३ गुन्ह्यात आय.पी.एस.अधिकारी श्री.कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
जमीन अपहारप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी अन्य आरोपी हे शासकीय अधिकारी असल्याने त्यांना न्यायालयाकडून ८ मार्च २०२२ पर्यंत अटक मनाई आदेश असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही. तसेच या गुन्ह्यातील दोन उपजिल्हाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडून कागदपत्रे उपलब्ध करून घेतली जातील, तसेच गुन्ह्यांची व्याप्ती जास्त असेल तर एस.आय.टी.मध्ये आणखी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून जलद गतीने तपास करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.
याबाबत प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री विनायक मेटे, अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता.