मुंबई प्रतिनिधी,दि. १० :- जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत ३ ऑगस्ट २०२१ रोजी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार १२५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
जुलै ते ऑक्टोबर, २०२१ या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांकरीता वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य निधीमधून जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. जुलै,२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्याकरिता वाढीव दराने राज्य निधीमधून एकूण रु. १२५०७.०१ लाख (अक्षरी रुपये एकशे पंचवीस कोटी सात लाख एक हजार फक्त) निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय ०७ मार्च २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.