बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

मुंबई, दि. १८ : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत ८एप्रिल २०२२ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यास तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *