बारामती, दि. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील निंबुत येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, सुनेत्रा पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, मार्केटिंग फेडरेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शामराव काकडे, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सविता काकडे, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, एकात्मिक विकास समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील, सरपंच निर्मला काळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.पवार म्हणाले, निंबुत गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात आला असून यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकास कामे दर्जेदार आणि वेळेत होणे आवश्यक आहे. शाळेमध्ये मुलांना प्रगत शिक्षण देणे आवश्यक आहे. शाळेला मैदानही हवे. बारामती येथील राजीव गांधी सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर मध्ये अत्याधुनिक उपकरणे आणि प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. खेड्यातील मुलांनी शाळेच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने या सेंटर ला भेट देणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडेल. सीएसआर च्या माध्यमातून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
निंबुत येथे घेण्यात आलेल्या हॉलीबॉल स्पर्धेतील विजेता सोलापूर पोलीस संघ, उपविजेता झुंझार हॉलीबॉल क्लब मुरटी आणि तृतीय क्रमांक दिल्ली नोएडा संघ यांना श्री. पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.
विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निंबुत येथील बाबा कमल उद्यान, सभामंडपाचे भूमिपूजन आणि पशुवैद्यकीय दवाखाना आणि बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय यांच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले.