५८ कोटी रुपयांची बनावट उलाढाल दाखवून कर चुकविल्याप्रकरणी एकास अटक

मुंबई, दि २१ :- खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी केल्याप्रकरणी, करचुकवेगिरीसाठी मे.ओम साई इंटरप्राईसेसचे मालक अनिल जाधव यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने दि.१९ एप्रिल २०२२ रोजी अटक केली आहे.

खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध राज्य शासनाच्या वस्तु व सेवाकर विभागाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. ओम साई इंटरप्राईसेस या प्रकरणात अन्वेषण करण्यात आलेले आहे.

मे. ओम साई इंटरप्राईसेसचे मालक अनिल जाधव हे प्रत्यक्षात कोणत्याही वस्तु व सेवा यांचा प्रत्यक्ष पुरवठा करीत नाहीत. तर फक्त खोटी बिजके देत असल्याचे या प्रकरणातील तपासणीदरम्यान आढळले आहे. या व्यक्तीच्या विवरण आणि बँक खात्यांमधून रु. ५८ कोटींची बनावट तसेच बेहिशेबी उलाढाल दाखवून आणि १०.४५ वस्तू व सेवा कर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित करुन १०.४५ कोटी रुपयांच्या कर महसुलाची हानी केली असल्याचे या प्रकरणातील तपासणीदरम्यान आढळून आले आहे.

अन्वेषणादरम्यान श्री.जाधव हे महसूल हानीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अनिल जाधव याला महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी दि.१९ एप्रिल २०२२ रोजी अटक केली आहे. या व्यक्तीचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवा कर कायदा २०१७ नुसार तुरुंगवासास पात्र आहे. त्याला मुख्य न्यायाधीश, ठाणे यांनी दि.०२. मे २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात अन्वेषण अधिकारी श्री. प्रेमजीत रणनवरे (सहाय्यक राज्यकर आयुक्त) हे श्री. देवेंद्र शिंदे (राज्यकर उपायुक्त) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. या  कार्यवाहीसाठी श्री. महेंद्र काटकर (सहायक राज्यकर आयुक्त) आणि श्री. तात्यासाहेब ढेरे (सहायक राज्यकर आयुक्त) यांचा सक्रिय सहभाग आहे.या कार्यवाहीसाठी श्री. राजेंद्र मसराम (राज्यकर सह-आयुक्त) तसेच श्री. गोविंद बिलोलीकर (अतिरिक्त राज्यकर आयुक्त) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

अशी फसवेगिरीची प्रकरणे शोधून त्यावर कार्यवाहीसाठी सर्वसमावेशक पृथ:करण साधनाच्या वापरावर विशेष भर देण्यात येत आहे.

अशा प्रकारच्या अटक कार्यवाहीद्वारे विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तींना कडक इशारा दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *