डेक्कन महाविद्यालयाचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा

पुणे, दि.०१:- येरवडा येथील डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेला श्री.सामंत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.  यावेळी कुलगुरु डॉ. प्रमोद पांडे, उपकुलगुरु डॉ. प्रसाद जोशी, शिक्षण संचालक धनराज माने, माजी कुलपती जी. बी. देगलूरकर आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, महाविद्यालयातील ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा अमूल्य असून तो जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करावे. या ऐतिहासिक ठेव्याचे डिजीटायझेशन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. संगणकीय यंत्रणेसाठी शासनाच्यावतीने आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. परिसराचा विकास करण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीमधून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा. मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा करुन डेक्कन महाविद्यालयाचा परिसर शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. सामंत म्हणाले.

यावेळी श्री.सामंत यांनी पुरातत्व संग्रहालय, प्रोगैतिहासिक विधीका, मराठा संग्रहालय, जमखिंडी संस्थान संग्रह, संस्कृत आणि कोशशास्त्र विभाग, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे विद्यार्थी असताना वास्तव्य असलेल्या खोलीस भेट देवून पहाणी केली.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या विकासाकरीता भरीव निधी देणार – उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देऊ असे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. विद्यापीठाच्या परिसरातील ‘महर्षी कर्वे कुटीर’ स्मारक स्वरुपात विकसित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन स्मारकाच्या विकासालाही निधी देण्याची ग्वाहीदेखील श्री. सामंत यांनी दिली.

कर्वे रोड येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, एसएनडीटी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. नलिनी पाटील, प्राचार्य डॉ. माधवी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, एसएनडीटी हे नावाजलेले विद्यापीठ असून या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य सक्षमपणे चालते. विद्यापीठातील सांघिक वृत्तीमुळे व क्षमतेमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासास मदत होत आहे.  विद्यार्थांच्या मागणीची दखल घेवून त्यांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यापीठातील रस्त्यांची कामे येत्या दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

विद्यापीठातील शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी, शिक्षण व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनाचे सहकार्य नेहमीच राहील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्रात बदल करण्यासाठी प्रयत्न करावेत. एकूणच पुण्याच्या शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध असल्याचे  श्री. सामंत यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना महान व्यक्तींची माहिती देण्यात येणार

आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील विद्यार्थांसोबत नागरिकांना महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे या महान व्यक्तींची माहिती मिळण्यासाठी अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.

यावेळी  ‘रिसर्च क्रोनीक्लर’ या नियतकालिकांचे प्रकाशन करण्यात आले तसेच विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेंच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *