नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीचा प्रयोग अनुकरणीय – कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले

नांदेड प्रतिनिधी, दि. १० :- पालक सचिव एकनाथ डवले यांनी नांदेड जिल्ह्यात दिनांक ०८ जून रोजी विविध ठिकाणी भेटी देऊन पीक पेरणीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. कासारखेडा तालुका नांदेड येथे शेतकऱ्यांनी बेडवर टोकन पद्धतीने व बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेल्या सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांचे कौतुक व अभिनंदन त्यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामात व उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बियाणे तयार करून स्वतः यावर्षी वापरले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बीबीएफ आणि टोकन पद्धतीने पेरणी झाली असून उगवण चांगली झाली आहे. हा उपक्रम राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय असून या पद्धतीचा इतर शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी केले.

 

कासारखेडा हे गाव राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प अंतर्गत निवडले असून या गावात१००हेक्टर वर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यावेळी प्रगतशील शेतकरी बाबाराव गोविंदराव आढाव, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील, सतिश सावंत, कृषी पर्यवेक्षिका शिंदे सुप्रिया तसेच कृषी सहायकांसह शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

धामदरी तालुका अर्धापूर येथील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटिकेस भेट देऊन सौ. गंगाबाई शामराव कदम या महिला शेतकऱ्याचे कौतुक केले. या ठिकाणी मागील वर्षभरात सुमारे 25 लाख भाजीपाला  रोपे तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली आहेत. यामधून सदरील महिलेस सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा नफा झाला आहे अशा पद्धतीच्या रोपवाटिका जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उभाराव्यात असे आवाहन एकनाथ डवले यांनी यावेळी केले.

 

यावेळी धामधरी येथील महिला शेतकऱ्यांना श्री डवले यांचे हस्ते महाबीजचे भाजीपाला मिनीट बियाणे वाटप करण्यात आले. भाजीपाल्याचा महिला शेतकऱ्यांनी आपल्या आहारात व कुटुंबाच्या आहारात समावेश करावा, असेही एकनाथ डवले यांनी सांगितले. या ठिकाणी दिगांबर रामराव कदम यांचे शेतावरील बीबीएफ वरील पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, तालुका कृषि अर्धापूर संजय चातरमल, अर्धापुर तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी , शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय कदम, गावचे सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोयाबीन आणि कापूस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रती हेक्टरी सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. यावर्षी राज्य शासनामार्फत नांदेड जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत करून विविध पातळीवर शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळाच्या माध्यमातून उत्पादकता वाढ करावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी केले. येथील  जिल्हाधिकारी कार्यालयात ८ जुलै रोजी आयोजित कृषी विभाग व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

नांदेड जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन बियाणे मध्ये शेतकऱ्यांनी चांगले कार्य केले असून ते राज्यासाठी आदर्शवत आहे. नांदेड जिल्ह्यात या खरीप हंगामात एकुण ७.६६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले असुन जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आतापर्यंत सुमारे ८७ टक्के क्षेत्रावर खरीप हंगामात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. खतांचा देखील मुबलक साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. विविध योजनांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात यावा. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी ग्राम परिवर्तन प्रकल्प म्हणजेच स्मार्ट योजना जिल्ह्यात राबविली जात असून या योजनेस गती द्यावी तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अवजारे बँक व इतर योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ दिल्याने प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन  इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कापूस संशोधन केंद्र प्रमुख खिजर  बेग, अरविंद पांडागळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, महाबीजचे अधिकारी, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळाचे अधिकारी व जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी व कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *