तत्परतेने मदतकार्य करणाऱ्या पोलीस

नागपूर, दि. २० : नागपूर पोलिसांनी चिखलापार येथील नदीच्या पुरात अडकलेल्या दहा व्यक्तींचे तात्काळ पोहचून प्राण वाचविले. त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने अडकलेल्या सर्वांना पुरातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर विभागीय आढावा बैठकीत पोलीस आणि मदत करणाऱ्या नागरिकांचा प्रशस्तीपत्र देत सत्कार करण्यात आला.

हिंगणघाट येथील ऐजाज खाँ गुलाम हुसेन यांच्या कुटुंबातील दहा सदस्य दोन वाहनांनी उमरेड येथून गिरडमार्गे हिंगणघाटकडे जात होते. चिखलापार नदीच्या पुराच्या पाण्यात वाहनासह अडकले. त्यांनी ११२ या मदत क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार उमरेड व भिवापूर पोलीसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत तत्काळ घटनास्थळी पोहचून त्याठिकाणी पोलीस कर्मचारी पोहोचले. बेसुर येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने पहाटे साडेचारच्या सुमारास सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामध्ये पाच पुरुष, चार महिला व एका बालकाचा समावेश होता. त्यानंतर उमरेड येथील शासकीय विश्रामगृहात निवासाची व्यवस्था करुन देण्यात आली. ही सर्व कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली.

बचाव पथकामध्ये उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर जोधे, पोलीस नाईक नितेश राठोड, पंकज बट्टे, सुहास बावनकर, उमेश बांते तसेच भिवापूर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस हवालदार रविंद्र लेंडे, पोलीस नाईक दिपक जाधव हे पोलीस कर्मचारी आणि बेसुर येथील जितेंद्र धोटे, विशाल चौधरी, निरंजन डंभारे, अंकित कुबडे, खोंडेश्वर शिंगाडे आदिंचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *