उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे येथील ‘लोकमत’च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
ठाणे प्रतिनिधी, दि. ११ : सध्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल अशा विविध प्रकारची माध्यमे संक्रमणावस्थेतून जात असून त्यांनी तत्त्व आणि ध्येय न बदलता जनतेपर्यंत सत्य पोहोचवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
दैनिक लोकमतच्या ठाणे येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, लोकमतचे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, सहसंपादक संदीप प्रधान, लोकमत मीडियाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला, सहयोगी संपादक यदू जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले, माध्यमांचं स्वरूप बदलत आहे. डिजिटल माध्यमातून मजकूर मोठ्या प्रमाणावर येत असून या सर्व बदलांमुळे माध्यमांची वेगळं जग निर्माण झाले आहे. संक्रणावस्थेतून जाणाऱ्या विविध माध्यमांपुढे तत्त्व आणि ध्येय टिकवितानाच समाजाच्या विचाराला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार डॉ. आव्हाड यांनी वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन करतानाच सोशय मीडियाच्या युगात मुद्रित माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी श्री. दर्डा यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. श्री. शुक्ला यांनी आभार मानले.