कृषी पायाभूत सुविधा निधी योजना

नांदेड, दि. १२ :- आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना कृषी संगम कार्यशाळा दि. १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेकडून आयोजित कृषी कार्यशाळेत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. यावेळी शेती क्षेत्रात उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतीमध्ये बदल होत असून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन उद्योग उभारले जात आहेत. अल्प तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर सुविधा मिळाव्यात यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना पाठबळ दिले जात आहे. याच हेतूने आत्मा यंत्रणने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

 

जिल्ह्यातील सर्व वित्तीय आणि सहभागी, भागदारी संस्था, विविध शासकीय विभाग, महामंडळे आणि प्रगतशील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी  उत्पादक कंपनी यांच्यात समन्वयासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. कृषी पायाभूत सुविधा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली.

 

या कार्यशाळेस जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड दिलीप दम्यायावार, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रवीण खडके, जिल्हा अग्रणी  बँकेचे अधिकारी श्री. गचके सोबत इतर बँकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यासोबत माविमचे चंदनसिंह राठोड, रेशीमचे देशपांडे, खादी ग्राम उद्योगचे कंधारे, इतर विभागाचे अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी व बीटीएम एटीएम उपस्थित होते. कृषी पायाभूत सुविधा योजनेतून दोन कोटी पर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज व पतहमी अधितम 7 वर्षापर्यंत देण्यात येते. नाबार्ड योजनेबाबत नाबार्डचे दमय्यावार, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व पोकरा योजनेबाबत आर. बी. चलवदे व स्मार्ट योजनेबाबत श्रीमती एम. आर. सोनवणे, बँकेविषयी माहिती श्री. गचके यांनी सादरीकरणाद्वारे दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती पुनम चातरमल, श्रीमती प्रियंका वालकर, श्रीहरी बिरादार, राहुल लोहाळे, संतोष मानेवर, गोविंद देशमुख, गवळी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *