धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

 

ठाणे, दि. २७ – धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम व स्व. दिघे यांच्या समाधीस्थळ असलेल्या शक्तिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. तसेच टेंभी नाका येथील स्व. दिघे यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त विपीन शर्मा, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री महोदयांचे ठाण्यात आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम आनंद आश्रम येथे जाऊन स्व. दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शक्तिस्थळावर जाऊन समाधीवर पुष्प अर्पण केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधून स्व. दिघे यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, स्व. आनंद दिघे व हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने राज्य सरकार काम करत आहे. गेल्या दीड महिन्यात सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार, पोलीस यांच्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्य घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. त्यांच्यासाठीच आम्ही काम करत आहोत.

 

आनंद आश्रम येथे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.

 

शक्तिस्थळावरील कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या वतीने आदिवासी पाड्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या फिरते आरोग्य केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

दै. ठाणे वैभवच्या नव्या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

दै. ठाणे वैभवच्या एलबीएस मार्गावरील नव्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी संपादक मिलिंद बल्लाळ, व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *