महाज्योतीच्या बैठकीत पीएचडीधारकांच्या फेलोशीपमध्ये वाढ करण्याचा ठराव – बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

नागपूर प्रतिनिधी, दि. २७ : महाज्योतीच्या आज घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना अवार्ड दिनांकापासून पहिल्या दोन वर्षासाठी रुपये ३१ हजार, अधिक घर भाडे भत्ता ( एचआरए ) व आकस्मिक खर्च, तर पुढील तीन वर्षासाठी रुपये ३५ हजार अधिक एचआरए अधिक आकस्मिक खर्च, असा ठराव आज घेण्यात आला.

 

महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (महाज्योती) संचालकांची आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय मंडळ नागपूर येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा ठराव घेण्यात आला. वित्त विभागाकडे यासंदर्भात अधिक निधीची मागणी करण्याचे संकेत यावेळी सावे यांनी दिले.

आजच्या बैठकीत सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे,महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार कुमार डांगे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त तथा संचालक सिद्धार्थ गायकवाड, अविनाश गंधेवार, लेखा अधिकारी अतुल वासनिक उपस्थित होते.

 

पीएचडी सोबतच तसेच एम. फिल. उमेदवारांना एमफिल ते पीएचडी असे एकत्रित लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या संदर्भात बार्टी पुणेच्या तज्ञ समितीने दिलेल्या शिफारशीवर चर्चा करण्यात आली. उमेदवारांना ३१ हजार अधिक एचआरए अधिक आकस्मिक खर्च देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.

 

युपीएससी साठी नवी दिल्ली येथे पूर्वतयारी करणाऱ्या उमेदवारांना मासिक विद्या वेतन १० हजारावरून १३ हजार इतके करण्यात आले आहे. तसेच आकस्मिक खर्च एक वेळा १८ हजार रुपये अनुज्ञेय करण्यात आला आहे, यासाठी विद्यार्थ्यांचा विशेष पाठपुरावा सुरू होता.

 

एमपीएससी राज्य मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलाखतीस पात्र उमेदवारांना २५ हजार एक वेळ अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

 

व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या वीस उमेदवारांना रुपये दहा हजार प्रतिमाह विद्या वेतन देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला आहे.

 

वित्त विभागाकडून मोठ्या प्रमाणात यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ही मंत्र्यांनी यावेळी सांगितले.सर्व जिल्ह्यांमध्ये महाज्योतीचे वसतीगृह सुरू करण्याबाबत गंभीरतेने या बैठकीत चर्चा झाली. याशिवाय सारथी ,बार्टी व महाज्योती या तीनही विभागाचा उत्तम समन्वय ठेवण्याचे निर्धारित करण्यात आले.

 

आजच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. बैठकीनंतर मंत्री अतुल सावे यांचे विशेष आभार मानले.

 

बैठकीपूर्वी आज सकाळी महाराष्ट्रातील विविध भागातील पीएचडी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या मंत्र्यांना सादर केल्या. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावर कार्यालयांची मागणी तसेच पीएचडीसाठी सरसकट फेलोशिप देण्यात यावी. शहरी व ग्रामीण विभागणी करण्यात येऊ नये, अशा प्रकारची मागणी देखील विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या  मागण्यांना व नावीन्यपूर्ण सूचनांना निश्चितच गंभीरतेने घेण्यात येईल, असे यावेळी सावे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर तातडीने काही मागण्यांवर ठराव घेण्यात आले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *