प्रदूषण होणार नाही अश्या जागेची निवड करण्याचे निर्देश
रेल्वेच्या उच्चाधिका-यांसह घेतली बैठक
चंद्रपूर, दि. ०५ ऑक्टोबर : चंद्रपूर, दि. ५ ऑक्टोबर : मुल शहरात होणारा मालधक्का हा सर्वांना मान्य असणा-या जागेवर, विशेषतः प्रदुषण न होणारी जागा निवडून त्याठिकाणी करण्यात यावा, याप्रकरणी लोकभावनेचा आदर करावा, असे निर्देश चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या उच्चाधिका-यांना दिले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहरातील मालधक्का शहराबाहेर हलविण्याच्या नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने रेल्वे विभागाच्या उच्चाधिका-यांसह वनभवन नागपूर येथे बैठक घेतली. या माल धक्क्यामुळे मुल शहरातील नागरिकांना मोठया प्रमाणावर प्रदुषणाचा सामना करावा लागणार आहे.
यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात टोलेवाही-केळझर-भगवानपूर या रस्त्यालगतच्या जागेला भेट देत पाहणी करावी व जनतेला व नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागू नये, अशा पध्दतीची जागा मालधक्क्यासाठी निवडावी, असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
दिनांक ७ किंवा ८ ऑक्टोबरला जागेची पाहणी करण्यात येईल व त्याअनुषंगाने योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक श्री. सुर्यवंशी यांनी दिले. यावेळी वरिष्ठ विभागीय प्रबंधक श्री. गर्ग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने, मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, चंदू मारगोनवार, प्रभाकर भोयर, अजय गोगुलवार, चंद्रकांत आष्टनकर, प्रशांत बोबाटे, अजय दुबे, नामदेव डाहूले आदी उपस्थित होते.