देगलूर प्रतिनिधी,दि.१५ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
त्यानिमित्ताने डॉ. संजय पाटील यांचे वाचनसंस्कृती या विषयावर व्याख्यान व विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. डॉ. संजय पाटील आपल्या व्याख्यानात म्हणाले की ज्ञानाला ज्ञान हाच पर्याय असून वाचन संस्कृती जोपासणे आणि ती विकसित करणे आपल्या पिढीची सांस्कृतिक जबाबदारी आहे. आपल्या विविध वैचारिक अस्मिता व व्यक्तिमत्व विकास वाचनातून होतो म्हणून विद्यार्थ्यांनी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
यावेळी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ होते तर व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, नॅक समन्वयक डॉ. लक्ष्मण सुदाम, पर्यवेक्षक संग्राम पाटील, हे होते. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सर्जेराव रणखांब यांनी केले. तर ग्रंथपाल साईनाथ शिंदे यांनी आभार मानले.