उपलब्ध पाण्याच्या काटेकोर वापराद्वारे कृषी विकासातूनच शेतकऱ्यांचे हित – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

परभणी, दि. ०७ :- कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाण्याचे प्रभावी नियोजन व त्याचा न्याय वापर अधिक महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील प्रकल्पीय सिंचन क्षमतेपैकी उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य मिळाल्यास कृषी क्षेत्राला त्याचा अधिक लाभ मिळेल या दृष्टीने संबंधित विभागप्रमुखांनी कटिबद्ध होऊन काम करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना,  अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, महापालिका आयुक्त देविदास पवार, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे आदि विभागप्रमुख उपस्थित होते.

 

प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे वैशिष्ट असलेले विशेष असे पीक, फळे, भाजीपाल्याचे वाण असते. अशा वाणांची आपल्या भौगौलिक वैशिष्ट्यांसह जीओ टॅगींग केली तर त्यात शेतकऱ्यांना आपल्या कृषी उत्पादनात अधिक मुल्यवृद्ध साध्य करता येईल. यासाठी कृषी विद्यापीठ व संबंधित विभागाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. या बैठकीत जिल्ह्यातील कोविडअंतर्गत केले जाणारे व्यवस्थापन, यासाठी उच्च तंत्रज्ञानाची घेतलेली मदत (आयसीटी), सामाजिक न्याय विभागाच्या योजना, ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हीटी, ई-पिक पाहणी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बांबू लागवड, कोविड काळात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राबविलेले उपक्रम, परभणी जिल्ह्याची भौगोलिक वैशिष्ट्ये याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सादरीकरणाद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापुढे विकास कामांचा आढावा ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *