नांदेड, दि. ३१ :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण १७९ बाधित गावात २ हजार ३१५ गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर १०४ पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर १०५० गावांवर लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
सद्यस्थितीत ४ लाख १५ हजार ६३६ प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या ३१ वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.