पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता; नागरिकांनी कोरोना दक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे – उपमुख्यमंत्री.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

पुणे,पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी

पुणे, दि.०९ :-  पुणे, पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर कोरोना नियमांचे पालन करुन मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. दुकाने, हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट सात टक्क्यांच्यावर गेल्यास कडक निर्बंध लावण्यात येतील, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. आता बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी कोरोना दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकंमत्री अजित पवार यांनी आज केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

 

पुणे कॉन्सिल हॉलच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खासदार वंदनाताई चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, आमदार दिलीप मोहिते, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील शेळके, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरामध्ये निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे, मात्र पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा रुग्णवाढीचा दर ५.५ आहे. पण तिथे लेव्हल ४ ऐवजी ३ ठेवली आहे. पुणे, पिंपरी चिंववड महानगरात शिथिलता देण्यात येत असली तरी कोरोना वाढणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. पुण्यातील प्रमाण ३.३ आणि पिंपरी चिंचवड ३.५ आणि ग्रामीणचे संसर्गाचे प्रमाण ५.५ आहे. ग्रामीण रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यासंदर्भात कोणताही निर्णय घेताना सर्वांची मते विचारात घेत निर्णय घेण्यात येतात. आपल्या सर्वांची मते विचारात घेत निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात येत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच १९ ऑक्सीजन प्लॉन्ट सुरू झाले आहेत, ३४ प्लांन्ट प्रस्तावित आहेत, नजीकच्या कालावधीत ऑक्सीजन प्लांट गतीने सुरू होतील, जिल्ह्याला ऑक्सीजनबाबत स्वंयपूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

हॉटेल आणि रेस्टॉरंटला ५० टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी आहे, प्रत्येक १५  दिवसांनी मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात हॉटेल फक्त ४ वाजेपर्यंत खुले राहतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही महत्त्वाच्या सूचना केल्या.

डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, कोरोनाची संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेता लसीकरणाला गती देण्याची गरज असून सर्व्हेक्षण तसेच चाचण्यांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त  राजेश पाटील यांनी महानगरपालिककेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली.  बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *