राजुरा बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी सुधारित मान्यता
अमरावती प्रतिनिधि, दि; १२ अमरावती जिल्ह्यातील राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेतील मौजे राजुरा (ता. चांदुर बाजार) येथील लघु पाटबंधारे धरणात पाणी आणणे व उजव्या कालव्याद्वारे सिंचन करण्याच्या प्रकल्पासाठीच्या 193 कोटी 81 लाख खर्चाच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. प्रकल्पाद्वारे अमरावती जिल्ह्यातील 6 गावांतील एकूण 1000 हे. क्षेत्रास सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
हा प्रकल्प राजुरा गावाजवळील राजुरा नाल्यावर प्रस्तावित असून खारपाण पट्ट्यातील योजना आहे. यामध्ये बेलोरा गावाजवळ काशी नदीवर वळण बंधारा बांधुन त्यातुन फिडर कालव्याद्वारे (पुरवठा कालवा) प्रस्तावित राजुरा बृहत लपा धरणात पाणी आणण्यात येणार आहे. तसेच त्यातून उजव्या कालव्याद्वारे (PDN) सिंचन करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता 5.989 दलघमी इतकी आहे.
या योजनेस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने 2008-09 मध्ये ४४ कोटी ७९ लाख रुपयांच्या तरतुदीस मूळ प्रशासकीय मान्यता दिली होती. या प्रकल्पाचे सन 2017-18 च्या दरसूचीवर आधारित रु.१९३.८१ कोटी इतक्या किंमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यतेची शिफारस राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती, नाशिकने केली होती. त्याला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार खास बाब म्हणून या प्रकल्पाच्या खर्चाच्या तरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.