पुणे दि.११ :- विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग यंदाही दहाव्या वर्षी रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने ” अखंड २४ तास आंबेडकरी विचारांचा जागर हा कार्यक्रम पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळा येथे आयोजित करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही रुग्ण हक्क परिषदेचे महारक्तदान शिबिर, चर्चासत्र, परिसंवाद, कवी संमेलन, आंबेडकरी गीतांचा जलसा याद्वारे मोठ्या प्रमाणात रुग्ण हक्क परिषदेने २४ तास कार्यक्रमांचे आयोजन केले.
महापरिनिर्वाणदिनी केलेल्या कार्यक्रमासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा साठ्ये, अजय भालशंकर, विशाल मारणे, विकास साठे, धनराज कदम, नितीन चाफळकर यांनी परिश्रम घेतले.
अभिवादनपर सुमारे ५२७ भीमसैनिक आंबेडकर अनुयायांनी रक्तदान केले.
महाराक्तदान शिबीर- महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त मा. पौर्णिमा पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान सोहळा आयोजित करणे हा आदर्श उपक्रम असून इतरांनी ही अशा पद्धतीने महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याची प्रेरणा घ्यावी, असे मत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.
यावेळी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे राज्य सचिव बाबू वागस्कर, लोक जनशक्ती पार्टीचे नेते अशोक कांबळे, रुग्ण हक्क परिषदेच्या विद्याताई चव्हाण, नगरसेवक अविनाश बागवे प्रमुख उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिन अभिवादन सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने अखंड २४ तास आंबेडकर विचारांचा जागर या उपक्रमांतर्गत अभिवादन सभेचे आयोजन केले होते.
या अभिवादन सभेमध्ये रिपब्लिकन नेते परशुराम वाडेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत दादा जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आरपीआयचे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, रिपब्लिकन नेते बाळासाहेब जानराव, काँग्रेस नेते अभय छाजेड, माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची भाषणे झाली.
या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन उपक्रमाचे संयोजक डॉ. अमोल देवळेकर यांनी केले.
आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम- अखंड २४ तास आंबेडकर विचारांचा जागर कार्यक्रमांतर्गत आंबेडकरी जलसाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा कला विकास संघाच्या माध्यमातून यावेळी सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे, विशाल चव्हाण, अमर पुणेकर, अशोक केमकर, सुरेश गायकवाड, प्रल्हाद शिंदे, एस. डी. शिंदे, अशोक सरोदे यांनी भीमगीतांचे सादरीकरण केले. अरे सागरा, मेरे बाबा की डोली चली, पाहण्यास माझ्या भीमरायाला या गीतांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
महिला नेत्यांचे अभिवादन- स्त्रियांचे मुक्तीदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे मत रिपब्लिकन युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुवर्णताई डंबळ यांनी व्यक्त केले. यावेळी भीमसेना माथाडी महासंघाच्या आरतीताई साठे, रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्ष शशिकला वाघमारे, मीनाज मेमन, रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्ष अपर्णाताई साठ्ये – मारणे, शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष नगरसेविका पल्लवी जावळे, या महिला नेत्यांची यावेळी अभिवादन पर भाषणे झाली.