देगलूर प्रतिनिधी, दि.२४:- शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आर्थिक दृष्ट्या गरीब व दुर्बल घटकासह तालुक्यातील सर्व रुग्णांना मोफत सी.टी.स्कॅन व डायलोसीसची मोफत सेवा मिळावी व जनता आरोग्य संपन्न रहावी या हेतुने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांनी गेल्या वर्षी तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे एक निवेदनाद्वारे सी.टी.स्कॅन
व डायलोसीसची मशिन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन तात्काळ सर्वे करून सी.टी.स्कॅन व डायलोसीस मशीन उपलब्ध करुन दिल्याने आता रुग्णाचा आर्थिक भार कमी होवून शहरातच मोफत सुविधा मिळणार आहे.
तेलंगाणा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेला दुर्गम तालुका म्हणून देगलूर तालुक्याला ओळखले जाते त्यासाठी तालुक्याच्या सर्वदूर भागातील रुग्णांना योग्य निदान होऊन दर्जेदार उपचार मोफत मिळण्याच्या हेतुने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांनी सन २०२१ मध्ये राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे देगलूर उपजिल्हा रुग्णालयासाठी सी.टी.स्कॅन व डायलोसीस मशीन उपलब्ध करून देण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली होती.
तेव्हा त्याची दखल घेत राज्याच्या आरोग्य विभागाकडून दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ रोजी सी. टी.स्कॅन मशिन उपलब्ध करुन देण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्याची अंमलबजावणी करून दिनांक १९ डिसेंबर २०२२ रोजी सी.टी.स्कॅन मशिन शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले. त्याच्या महिनाभरा पुर्वीच डायलोसीस मशीनही उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहीती देगलूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिली आहे.