मुंबई, दि. २७ : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाच्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये १५ जानेवारी, २०२३ पर्यंत बदल (रिकॅलिब्रेट) करुन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई यांनी केले आहे.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाना धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम १.५ किलोमीटरसाठी पूर्वीचा दर २१ रुपये होता. आता वाढीव दर २३ रुपये, असा ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी १४.२० पैसे होता, तो आता १५.३३ पैसे केला आहे.
टॅक्सीसाठी प्रथम १.५ किमीसाठी पूर्वी २५ रुपये होते. तो आता २८ रुपये असा ठरविण्यात आला असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी १६.९३ पैसे होता, तो आता १८.६६ पैसे व कूल कॅब (वातानुकूलित) साठी प्रथम १.५ किमीसाठी
पूर्वीचा दर ३३ रुपये भाडेदर होता, तो आता ४० रुपये असा दर ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वीचा दर २२.६६ पैसे होता, तो सुधारित २६.७१ पैसे असा ठरविण्यात आला आहे. ही भाडेवाढ १ ऑक्टोबर २०२२ पासून अंमलात आली आहे.