व्हॅलेंटाइन डे (मैत्री दिवस) साजरा करा परंतु व्यसनमुक्त मित्र बनवा

 

 

 हिंगोली, दि. ०१ :  आजमितीस १४ फेब्रुवारी  हा दिवस सर्वत्र व्हॅलेंटाईन डे (मैत्री दिवस) साजरा करण्याची प्रथा युवा पिढीमध्ये रुजत आहे. त्यानिमित्ताने नवीन मित्र बनवताना व्यसनमुक्त मित्र बनवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नशामुक्त भारत अभियान जिल्हास्तरीय समितीची बैठक आज घेण्यात आली. यावेळी प्र.पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेश येडके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, व्यसनमुक्ती कार्यक्रम कार्यकर्ता विशाल अग्रवाल, शाम सोळंके, दिपक वडकुते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, शिक्षण विभाग, जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

            जिल्हाधिकारी श्री. पापळकर पुढे म्हणाले, व्हॅलेंटाइन डे साजरा करताना व्यसनमुक्त मित्र मिळवा. तसेच प्रत्येक शाळा, महाविद्यालयातून विशेष कार्यक्रम घेऊन नशामुक्तीचे कार्यक्रम घेण्यात यावेत. याद्वारे समाजात जनजागृती करावी. पोलीस प्रशासनाच्या मदतीने आगामी येणाऱ्या होळी सणानिमित्त व्यसनाची आहुती देऊन होळी साजरी करावी. प्रत्येक कार्यक्रमानंतर व्यसनमुक्तीचा संकल्प घेण्यात यावा, असे सांगितले.

 

 

 

 

 

 

            जिल्हाभरात नशामुक्ती अभियान राबविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कार्यक्रम कृती आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सूचना दिल्या. पोलीस विभागाच्या सहाय्याने प्रत्येक गावातील व्यसनाधीन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे समुदेशन करणे, व्यसनाच्या दुष्परिणामाची पोस्टर, प्रदर्शने, पथनाट्य, चित्र प्रदर्शन, व्याख्यान, प्रबोधन अशा विविध स्वरुपाचे उपक्रम राबवावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *