देगलूर प्रतिनिधी,दि. ०४ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर राज्यशास्त्र विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन पद्धती: प्रवाह व तंत्रे या विषयावर दिनांक ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्य स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ अजय टेंगसे यांच्या हस्ते होणार आहे.
साधन व्यक्ती म्हणून प्रा डॉ घनश्याम येळणे व प्रा डॉ चंद्रकांत बावीस्कर हे उपस्थित राहणार आहेत. ते संशोधन पद्धतीशी संबंधित तंत्रे, प्रवाह , अहवाल लेखन, संशोधन व प्रकाशन नैतिकता आणि तथ्य संकलन व विश्लेषण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. अशोक सिद्धेवाड, डॉ.धोंडीराम धुमाळे व डॉ. संजय गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेस राज्यातील विविध महाविद्यालयातील व विद्यापीठातील संशोधन (पीएच. डी.) करणारे पूर्णवेळ प्राध्यापक,तासिका तत्त्वावर कार्यरत प्राध्यापक व विविध शाखेतील
पदव्युत्तर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य व समन्वयक डॉ मोहन खताळ, उप प्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, संयोजन सचिव डॉ. आर बी लक्षटे व सह संयोजन सचिव डॉ माधव चोले यांनी केले आहे. या कार्यशाळेस यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ मोहन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठण करण्यात आले.