चंद्रपूर, दि. १० :- ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ हे महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी अभियान, ० ते १८ वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग व समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयाने राज्यभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी चंद्रपूर येथील महर्षी विद्यामंदीर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बंडू रामटेके, संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, शाळेच्या प्राचार्या लक्ष्मीमूर्ती आदींची उपस्थिती होती.
‘जागरुक पालक सुदृढ बालक’ हे अभियान जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्हयात एकूण ५ लक्ष २ हजार ४१८ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
त्याकरीता ३३९ आरोग्य पथकांचे सकंलन करण्यात आले आहे. या अभियानाच्या दोन महिन्याच्या कालावधीत १७३६ शासकीय शाळा, ४३८ अनुदानीत शाळा, २४८ खाजगी शाळा, ४१८० शासकीय अंगणवाड्या, खाजगी बालवाड्या, ८५१६ दिव्यांग शाळा, २ बालगृहे, २ अनाथालय व १२३ आश्रमशाळा तपासण्यात येणार आहेत. सदर अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी अथक प्रयत्न करीत आहेत.