राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचे विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

 

पुणे, दि.१७ :-  राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वागीण विकासासाठी बांधिल असून इतर घटकांप्रमाणे दिव्यांगासाठी देखील राज्यात नवीन स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असून त्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ त्यांच्या उपस्थितीत झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, दिव्यांग विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद, श्री समर्थ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शासनाने समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी विविध प्रयत्न केले आहेत, त्यातूनच इतर मागास बहुजन कल्याण विभाग, तसेच स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात दिव्यांगातून चांगले खेळाडू घडावेत यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धातून दिव्यांगही कुठे कमी नाहीत असा संदेश समाजासमोर आला आहे. यामुळे  दिव्यांग मुला मुलीचे मनोबल वाढेल असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.

 

 

 

 

अजित पवार म्हणाले, या राज्यस्तरीय स्पर्धांमुळे दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याबरोबरच नवीन अनुभूती त्यांना मिळाली आहे. अशा स्पर्धातून राज्य पातळीवरचे खेळाडू तयार होऊन देशपातळीवर निश्चित राज्याचे व देशाचे नाव उंचावतील. भविष्यात दिव्यांगांसाठी देखील पॅरा ऑलिम्पिक ग़टातील स्पर्धा आयोजित करण्याबाबत प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

 

प्रास्ताविकात आयुक्त श्री. देशमुख म्हणाले, स्पर्धेत २ हजार १७४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात १३०० मुले व ८५० मुली यांनी सहभाग घेतला आहे. पुणेसारख्या शहरात समाजातील सर्व घटकांचे सहकार्य लाभल्यामुळे या स्पर्धांचे आयोजन शक्य झाले, असे श्री. गारटकर यांनी सांगितले.

 

 

 

 

कार्यक्रमास दिव्यांग विभागाचे उपायुक्त संजय कदम, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, संदीप खर्डेकर, अमोल उन्हाळे यांच्यासह राज्यातील दिव्यांगांसाठी काम करणारे विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, दिव्यांग मुले मुली, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

नागपूर जिल्ह्याला विजेतेपदपुणे उपविजेता

१४ फेब्रुवारीपासून तीन दिवस चाललेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले. मूकबधिर, कर्णबधिर, व बहुविकलांग या तीन प्रवर्गात विजेता संघ म्हणून नागपूर जिल्ह्याला मान्यवरांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले. तर अंध प्रवर्गात अमरावती, अस्थीव्यंग प्रवर्गात उस्मानाबाद जिल्हा, व मतिमंद प्रवर्गात मुंबई उपनगर जिल्ह्यात विजेता म्हणून चषक प्रदान करण्यात आला.

 

 

 

अंध, मूकबधिर, कर्णबधिर, अस्थिव्यंग या प्रवर्गात पुणे जिल्हा उपविजेता  ठरला आहे. बहुविकलांग प्रवर्गात लातूर जिल्हा उपविजेता संघ म्हणून ठरला आहे. या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *