सोलापूर/पंढरपूर दि.०४ :- पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. या भाविकांना अनेक सोयी-सुविधांबरोबरच भजन, कीर्तन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम घेता यावेत, यासाठी राज्य शासन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून नामसंकीर्तन सभागृहाचे काम सुरू आहे.
या नामसंकीर्तन सभागृहाच्या कामाची पाहणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी तथा नगरपालिका प्रशासक गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्यधिकारी अरविंद माळी, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रतिवर्षी लाखो भाविक मोठ्या भक्तीभावाने विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी पंढरीची वारी करतात. अधिकाधिक सोयी सुविधा देऊन भाविकांना विठू माऊलीचे दर्शन सुकर व्हावे यासाठी शासन व स्थानिक प्रशासन प्रयत्नशील असते. भाविक व कला रसिकांच्या सोयीसाठी असाच एक प्रकल्प नामसंकीर्तन सभागृहाच्या माध्यमातून पंढरपूर येथे साकारत आहे.
या नामसंकीर्तन सभागृहाचे काम काही प्रमाणात निधीअभावी अपूर्ण असून, या सभागृहास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. या माध्यमातून पंढरपुरात भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.