सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत घरकुल देणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत.

नागपूर, दि. १७  :  सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत  बांधण्यात  आलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील २ हजार ९८० घरकुलांची सोडत  पालकमंत्री  यांच्या उपस्थितीत  काढण्यात  आली,  त्यावेळी  ते  बोलत  होते. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्रमांक तीन घरकुलांची  सोडत आज आभासी प्रणालीद्वारे काढण्यात  आली. यावेळी डॉ. राऊत  यांनी रिमोटची कळ दाबून सोडतीचा  शुभारंभ केला. क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आदी यावेळी आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प हा केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे  पंतप्रधान आवास योजना (शहरी) घटक क्रमांक ३ अंतर्गत सन २०१८ पासून या बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑगस्ट २०१९ रोजी एकूण ४ हजार ३४५ घरकुलांपैकी ४ हजार १७२ घरकुलांची सोडत काढण्यात आली होती. एकूण ४ हजार ३४५ घरकुलांपैकी २ हजार ९८० घरकुले वाटपास उपलब्ध असून या घरकुलांची सोडत आज करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एन.एम.आर.डी.ए.) कार्य प्रशंसनीय असल्याचे सांगत डॉ. नितीन राऊत म्हणाले की,  नागपूरसारख्या महानगरामध्ये घरांचे स्वप्न साकार करणे हे सोपे नाही. वाढलेल्या जमिनीच्या किंमती, घरांच्या बांधकामासाठी आवश्यक  असलेल्या साहित्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांना शहरात घर बांधणे व स्वतःच्या घरात राहण्याची संधी फार कष्टाने मिळते. प्रत्येकाला स्वत:च्या हक्काचे घर मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेमुळे सर्वसामान्यांना घरकुले मिळाली आहेत.  या योजनेंतर्गत शहरात वाठोडा तरोडी (खुर्द) व वांजरी या भागात घरकुल बांधण्याचे प्रकल्प सुरू करून जवळपास ४ हजार ३४५ घरकुल बांधून तयार झालेली आहेत. म्हणजे एवढ्या लोकांना हक्काचे घर लवकरच मिळणार आहे. लोकांनी घरकुलांची सारी रक्कम भरल्याने त्यांना घरकुलाचा ताबाही मिळाला आहे. उरलेल्या जवळपास ३ हजार घरकुलांची सोडत झालेली आहे. शहराच्या विकासासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल वाटपाचे दुसरे टप्पे लवकरच विकसित करण्यात येणार आहे. एन.एम.आर.डी.ए. च्या योजनांना पालकमंत्री या नात्याने मी संपूर्ण सहकार्य करील, असा विश्वास डॉ.राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वसामान्य माणूस आपल्या आयुष्याची पुंजी  घर बांधण्यासाठी लावत असतो. त्यामुळे या योजनेंतर्गत  घरांचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे राहील, याकडे एन.एम.आर.डी.ए.च्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

या योजनेत सोडत लागलेल्या सर्व विजेत्यांना  डॉ.राऊत, श्री.केदार तसेच श्री.तुमाने यांनी आभासी प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्यात.

एन.एम.आर.डी.ए.चे आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त संदीप इटकेलवार, प्रकल्प अभियंता लिना उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *