शहिदांच्या बलिदानाचा आणि त्यागाचा इतिहास नवीन पिढीला सांगणे गरजेचे – विजय वडेट्टीवार.

चंद्रपूर दि. १७ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, तेव्हा ऑगस्ट १९४२ मध्ये चिमूर (जि. चंद्रपूर) आणि आष्टी (जि.वर्धा) ही गावे तीन दिवस स्वतंत्र होती. मात्र इंग्रजांनी दडपशाहीचा अवलंब केला आणि नागरिकांना घरात डांबून ठेवले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी चिमूरमध्ये १६ ऑगस्ट १९४२ रोजी १६ वर्षीय बालाजी रायपूरकर हा तरुण इंग्रजांना सामोरा गेला व छातीवर गोळ्या झेलत शहीद झाला. या शहिदांच्या बलिदानाचा आणि त्यागाचा इतिहास नवीन पिढीला सांगणे गरजेचे आहे, असे मत मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

चिमूर क्रांती दिनानिमित्त येथील शहीद स्मारकाला अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य ममता डुकरे, गजानन बुटके, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार श्री. कोवे, न.प.मुख्याधिकारी गजानन भोयर, पोलिस उपअधिक्षक नितीन बगाटे, ठाणेदार श्री. शिंदे, प्रकाश देवतळे, घनश्याम डुकरे, शिवानी वडेट्टीवार आदी उपस्थित होते.

९ ऑगस्ट १९४२ ला क्रांती दिनी महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोनलाचा बिगुल फुंकला. १६ ऑगस्ट रोजी राष्ट्रसंतांच्या विचारातून स्वातंत्र्याची पहिली ठिणगी चिमूरमध्ये पडली आणि चिमूर स्वतंत्र झाले. मात्र इंग्रजांनी तीन दिवस नागरिकांना घराबाहेर पडू दिले नाही. इंग्रजांची दडपशाही रोखण्यासाठी बालाजी रायपूरकर व इतर नागरिक बाहेर पडले. यात बालाजी रायपूरकर शहीद झाले.

इंग्रजांच्या पारतंत्र्यात असतांना देशातील स्वतंत्र होणारे पहिले गाव म्हणून चिमूरचा इतिहास लिहिला गेला. विशेष म्हणजे बर्लिन येथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चिमूर स्वतंत्र झाल्याची घोषणा रेडीओद्वारे केली. इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराविरुध्द लढण्याचे धाडस चिमूर आणि आष्टी या गावांनी केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले असून त्यांच्या सांडलेल्या रक्तामुळे आज आपण स्वातंत्र उपभोगत आहोत.

या शहिदांचे स्मरण करून त्यांचा त्याग, बलिदान, समर्पित भावना आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. चिमूर क्रांतीचा इतिहास हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अजरामर पर्व आहे. त्याचे विस्मरण होता कामा नये. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि १६ ऑगस्टचा क्रांती दिन कायमस्वरुपी लक्षात ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी त्यांनी नागफणी स्मारक परिसरात असलेल्या तुकडोजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच शहीद बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

उपजिल्हा रुग्णालयात रक्तसाठा केंद्राचे उद्घाटन 

चिमूर क्रांती दिनानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते रक्तसाठा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगांबर मेश्राम, वैद्यकीय अधिक्षक गो.वा. भगत, डॉ. अगडे, डॉ. गेडाम, डॉ. चौधरी व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *