पार..

 

 

पंढरी मामाच्या घरून मला बोलावन आल होतं. काहीतरी बिघडलं होतं अन मामा बिथरला होता. नात्यातला न गोत्यातला मामा जीवाभावाचा. पंढरी मामा माझ्यापेक्षा बराच मोठा होता. त्यांच्या मोठ्या मुलापेक्षा मी चार-पाच वर्षांनी मोठा होतो पण तो मला मामाच म्हणायचा. सगळ्याच बाबीत माझ्यावर विश्वास .

जसं कळलं तसं तातडीने पंढरी मामाच्या घराकडे निघालो. वारकरी संप्रदायाला मानणारे घर बऱ्यापैकी जमीन दोन मुलं मुलगी असं घर परिवार. काय झालं असेल याच विचाराने त्यांच्या घरात पाऊल टाकल .

 

 

 

 

मामा जरा रागातच होता पण मला बघताच त्यांचा राग कमी झाला अन् म्हणाला. या मामा आता तुम्हीच काय ते ठरवा मी मुलांना सुनांना बोलावलं काय झाले ते मामा पुढे विचारू लागलो. तसं मला नात्यात ताणतणाव आल्याचे कळू लागलं. मामाचं वय झालं होतं आणि पोरांना आता आपण स्वतंत्रपणे व्यवहार करावा वाटू लागलं होतं. मामी गेल्यापासून पंढरी मामाचा विरक्त झाला होता पण व्यवहार अजून हातातच होता. वय झाल्यामुळे शेताकडे म्हणावं तसं तो लक्ष देऊ शकत नव्हता. याचाच परिणाम होऊन काहीतरी वाद निर्माण झाला होता.

 

 

 

 

 

पण या सर्व गोष्टी पंढरी मामाला कोण सांगणार मग मनावर दगड ठेवून मी म्हणालो. मामा आता तुमचं वय झालं पोरही करतातच की चांगलं .मग त्यांचं त्यांना संसार करू द्या आणि सर्व जबाबदारीतून तुम्ही मुक्त व्हा. मामा म्हणाला बरोबर आहे मलाही कंटाळा आलाय पण ह्यांना अक्कल आली नाही. मी म्हणालो त्यांना मोकळं सोडा हळूहळू येईल अक्कल, चुकलं तर तुम्ही सांगा. पंढरी मामा म्हणाला बरं मामा तुम्ही म्हणता तर सगळ सोडतो आणि पार धरतो .

 

 

 

 

 

मी पोरांना म्हणालो बघा मामा पार धरतो म्हणून लागलेत .सगळ तुमचं तुम्ही सुधरून घ्या पण मामाला जेवण ,चहापाणी ,बीडी काडी कपडा लत्ता कमी पडू नये. मिटलं का मग. तसं मामा म्हणाला मिटायला काय इथं भांडण आहे काय.
त्यांचा निरोप घेऊन मी ठिकाण्याकडे निघालो तसा मामा नेहमीप्रमाणे माझ्या मागे मागे चालू लागला. आम्ही दोघांनी ठिकाणा गाठल. बऱ्याच गप्पा झाल्या मामा आज वेगळ्या च भाव विश्वात होता. काम सोडून निवृत्ती तो घेत होता.

 

 

 

 

 

मामीच्या आठवणी सांगताना तिने या संसारासाठी कशा खचता खाल्ल्या सांगू लागला की मामाच्या डोळ्याला धारा लागायच्या. तसा मी धीर देत म्हणालो गावच पार आहे, आपलं ठिकाणा आहे, तुमचं घर ही आहेच की चार दिवस तुमचे आनंदात घालवा.

 

 

 

 

ग्रामीण संस्कृतीत पार धरणे म्हणजे संसारातील जबाबदारीतून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळणे आणि म्हातारपणाचे दिवस समाधानाने घालवने . गावातील पार म्हणजे ग्रामदेवतेचे मंदिर ते कधी हनुमान मंदिर असतं तर कधी विठ्ठल रुक्माई च, महादेवाच तर कधी भवानी मातेच.

 

 

 

 

पंढरी मामा आता पार धरला होता सकाळी स्नान संध्या झाली की मग काहीतरी न्याहारी करायचं. गावातल्या हॉटेलवर चहाचा बोट घ्यायचा एक बिडी कट्टा काड डब्बी खिशात ठेवत पार गाठायचा. दुपार होऊ लागली तसं जेवण करण्यासाठी घराकडे परतायचा दुपारची झोप कधी पारावर तर कधी घरात पूर्ण करायचा आणि संध्याकाळी पुन्हा पारावर वेळ घालवायचा कधी भजनात काकड आरती मन रमवायचा.

 

 

 

 

पंढरी मामा सारखे काही मंडळी पार धरली होती ती सगळी पारावरची मंडळी जीवनाची संध्याकाळ आनंदात घालवत होती. एकमेकांचे सुखदुःख जुन्या आठवणी अनुभव सांगत ऐकत होती गावातील गावकऱ्यांना वेळ मिळाला की तेही या पारावरील मंडळी सामील होत .बऱ्याच अडचणीचे उत्तर या अनुभवी मंडळीकडे असायचे ही. पारावरिल अनुभवी मंडळी बऱ्याचदा सल्लाही देत.

                                                                     (छाया संग्रहित )

मीही अनेकदा या परावरील मंडळीत सामील व्हायचो. काळ जसा लोटत गेला तसा मी माझ्या कामात आणि पंढरी मामा पारावर रमला होता. पावसाळ्याचे दिवस होते निसर्गानेही हिरवी चादर आपल्या अंगावर ओढली होती. मी ठिकाणावर मुक्कामाला होतो झापड पडली तसे कररर करत. परावरील लाऊड स्पीकर चालू झाला काही कळण्याच्या आतच बंद ही झाला. बरेच दिवस झाले पारावर गेलो नाही या विचाराने पार गाठला आणि बघितलं तर भजन चालू होतं पंढरी मामा मृदंग वाजवण्यात गुंग होऊन गेला होता.

 

 

 

 

 

भजन झालं आरती झाली पारावरची मंडळी माझ्या भोवती गोळा झाली. चर्चा सुरू झाली तसे मला कळलं श्रावण महिन्यातील पोथी सुरू झाली आहे. पंढरी मामा चर्चेत भाग घेत म्हणाला पोथी संपली की परु आहे. तुम्हाला रावाव्हच लागेल. मी आनंदाने होकार दिला.

 

 

 

 

परू म्हणजे गाव जेवण पण हे कोणा एका व्यक्तीकडून दिले जात नाही गावकरी मंडळी एकत्र येऊन सर्वांच्या सहभागातून गाव जेवण देतात. सर्वच लहान मोठी स्त्री पुरुष यात सहभागी होतात. ही एक भारतीय संस्कृतीचे देणंच आहे. याविषयी नंतर कधीतरी लिहू. ठरल्याप्रमाणे परू ही झाला आणि मी ही त्यात सामील झालो. का कुणास ठाऊक मनात आलं आणि परुच्या दिवशी खोसल्याचा शमला घेतला.अन मामानं तितक्याच आनंद शमला बांधला ही.

 

 

 

 

 

काळ पुढे सरकत होता तशी मामाची तब्येत खालावत चालली होती. मामांना पार सोडून घरी बाज धरली ही वार्ता मला कळली. घरी जाऊन भेटूनही आलो. पिकलं पान पानझडीला गळणारच पण मन मानत नव्हतं. होणार टळणार नव्हतं. मामा गेल्याची खबर मला कळली तसा दुखी मनान अंत्यविधीला हजर राहिलो. आणि सहजच लक्षात आलं शेवटच्या क्षणी मामाच्या डोक्यावर मी आणलेला खोसल्याचा शमला होता. मामा या शब्दाचा नव्हे नात्याचा मान राखला की काय असे वाटून गेले.
सरना वरील जळणाऱ्या मृतदेहाला मी बघत होतो‌.

 

 

 

 

 

 

अग्नीच्या ज्वाला मामाच्या मृतदेहाला कव्हेत घेत होत्या तर भावनांच्या अनेक ज्वाला माझ्या मनात पेट घेत होत्या. तसा एक काका मला धीर देत म्हणाला चल काका जाऊत आता न थांबता पुढे म्हणाला ये बापू तु उद्या घरी मलाही पार धरायचा आहे.
आता पारावर मामा नव्हता काका होता आयुष्याची संध्याकाळ घालवायला, पारावरची मंडळींनाही स्वतःला गुंतून घेतल अध्यात्मात एक गडी गेला होता तर दुसरा नवीन गडी सामील झाला होता त्यांच्यात.

 

 

 

 

हे असंच वर्षाने वर्ष चालत आल होतं. कदाचित पुढेही असेच चालू राहील एवढं मात्र निश्चित याच पारावरच्या संस्कृतीमुळे ग्रामीण भागात वृद्धाश्रम नाहीत. कोणी आपल्या माय बापाला वृद्धाश्रमात ठेवत नाही याचाच अभिमान व आनंद वाटला. खरंच देवधर्म, संगीत ,सुखदुःख ,पाळणा लग्न ,अंत्यविधी या साऱ्याच मध्ये पाराला अत्याधिक महत्त्व आहे. ग्रामीण जीवनाला आधार देणाऱ्या या पाराला मानाचा मुजरा.

 

@मी एक आनंदयात्री
राजू पाटील लच्छनकर

६३०४८७३७२४ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *