मुखेड प्रतिनिधी,दि.१० :- मुखेड तालुक्यातील मागील ३८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या लेंडी धरणाच्या बाधित क्षेत्रातील बारा गावातील वाढीव कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनाच्या मागणीला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती मुखेड- कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी दिली.
महाराष्ट्र व तेलंगाना राज्याच्या सीमावरती भागातील लेंडी या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या कामास सुरुवात होऊन ३८ वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. पण धरणाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. धरणाच्या बाधित क्षेत्रातील बारा गावांच्या पुनर्वसनाचे व नागरी सुविधांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.
नागरी सुविधांच्या व पुनर्वसनाच्या प्रश्नांच्या अभावी या बारा गावातील नागरिक हालाखीचे जीवन जगत आहेत. या धरणाच्या कामास गती मिळाली पाहिजे व बारा गावांच्या पुनर्वसनाचे व नागरी सुविधांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत यासाठी आ. डॉ. तुषार राठोड हे सतत प्रयत्नशील आहेत.
मागील शासनाच्या काळात आ. डॉ. तुषार राठोड यांनी या कामाला गती देण्यासाठी ३०० कोटी रुपये पेक्षा अधिक निधी मंजूर केला. बाधित क्षेत्रातील मुक्रामाबाद या सर्वात मोठ्या गावाच्या पुनर्वसनासाठी जमिनीची उपलब्धता होत नसल्यामुळे या गावाच्या स्वेच्छा पुनर्वसनास महाराष्ट्र शासन व पुनर्वसन प्राधिकरणाकडून विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवण्यात आ. डॉ. तुषार राठोड यांना यश आले.
२०१५ साली मुक्रामाबाद या गावातील घरांच्या मावेजांचा निवाडा होऊन सुद्धा याची रक्कम नागरिकांना अदा करण्यात आली नव्हती. मुक्रामाबाद या गावाच्या स्वेच्छा पुनर्वसनास विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाल्यानंतर ९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या गावातील प्रकल्प बाधितांना त्यांच्या घरांच्या निवाड्याची रक्कम अदा करण्यात आली.
१९८४-८५ साली या धरणाचे काम सुरू झाले होते. मागील 38 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या धरणाच्या बाधित क्षेत्रातील बारा गावातील कुटुंबांची संख्या सुद्धा वाढली आहे. ज्या गावांचे पुनर्वसन शासनाने केले आहे अशा गावांच्या गावठाणात वाढीव कुटुंबांना जागा उपलब्ध नाही. धरणाचे काम पूर्ण करण्यापूर्वी या वाढीव कुटुंबांचे सुद्धा पुनर्वसन करणे गरजेचे आहे.
बाधित क्षेत्रातील बारा गावातील वाढीव कुटुंबांचे सर्वेक्षण करा व या सर्व कुटुंबीयांना मुक्रामाबाद या गावाच्या धरतीवर स्वेच्छा पुनर्वसनाचा लाभ द्या अशी मागणी आ. डॉ. तुषार राठोड यांनी मागील काही कालावधीपासून लावून धरली होती. आ. डॉ. तुषार राठोड यांच्या मागणीमुळे या बारा गावातील वाढीव कुटुंबांचे सर्वेक्षण संबंधित विभागातर्फे पूर्ण करण्यात आले व ३११२ कुटुंब संख्या निश्चित करण्यात आली.
मुक्रामाबाद या गावाच्या स्वेच्छा पुनर्वसनाच्या धरतीवर तीन लक्ष ७० हजार रुपये प्रति कुटुंब लाभ निश्चित करून १३० कोटी रुपयांची मागणी जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आली होती. आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नाने आता लेंडी धरणाच्या बाधित क्षेत्रातील बारा गावातील या वाढीव कुटुंबांच्या स्वेच्छा पुनर्वसनाच्या मागणीला शासनाने मंजुरी दिली आहे.
वाढीव कुटुंबांना दिला जाणाऱ्या लाभाच्या रकमेपोटी शासनाने ५८ कोटी रुपये संबंधित विभागाकडे वर्ग केले आहेत. तात्काळ हा निधी महसूल विभागाकडे वर्ग करण्यात येईल व लाभार्थ्यांना अदा करण्यात येईल. अशी माहिती आ. तुषार राठोड यांनी दिली.
विस्थापितांच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्यांना न्याय दिल्यामुळे आ. डॉ. तुषार राठोड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे