मुंबई प्रतिनिधि,दि.१९: लॉकडाऊनच्या काळातील उत्पादित दूध भुकटी आणि बटर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) यांना वर्किंग स्टॉक म्हणून देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
लॉकडाऊनमध्ये प्रतिदिन १० लाख लिटर दूध शेतकऱ्यांकडून घेऊन त्याचे रुपांतरण दूध भुकटीमध्ये करण्याची योजना राबविण्यात आली होती. या योजनेत ७ हजार ७६४ मे.टन दूध भुकटीचे उत्पादन झाले. यापैकी १५०० मे.टन दूध भुकटी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत देण्यात आली असून उर्वरित ६ हजार २६४ मे.टन भुकटीपैकी ३११७ मे.टन भुकटी एनसीडीएफआय पोर्टलवर विक्री करण्यात आली आहे. महानंदकडे आता या योजनेंतर्गत ३२४७ मे.टन इतकी भुकटी शिल्लक आहे. याशिवाय ४०४४ मे.टन देशी कुकींग बटर पैकी ३५८५ मे.टन बटर विकण्यात आले असून ४५९ मे.टन बटर शिल्लक आहे. शिल्लक राहिलेली भुकटी व बटर हे महानंदला वर्किंग स्टॉक म्हणून व्यवसायासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.