नंदुरबार;दि.१२ :- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वर्ष २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील ३ हजार १२८ शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला असून या योजनेत जिल्ह्यातील १ हजार ७२४ पूर्णांक ४५ हेक्टर क्षेत्रावर या योजनेत फळबाग लागवड करण्यात आली आहे. तसेच चालू वर्ष २०२३-२४ मध्ये २ हजार २४० हेक्टरवर या योजनेत फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर हे पुढील वर्षाच्या नियोजनासंदर्भात बोलताना पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते.
ते म्हणाले, जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीतील फलनिष्पत्ती लक्षणीय अशी आहे. जिल्ह्यात वर्ष २०२२-२३ साठी २ हजार २४० हेक्टरवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करण्यात येणार असून त्यात नंदुरबार तालुक्यात ४८० हेक्टर, नवापूर तालुक्यात ४८० हेक्टर, अक्कलकुवा तालुक्यात ३६० हेक्टर, शहादा तालुक्यात ४८० हेक्टर, तळोदा तालुक्यात २२० हेक्टर, अक्राणी तालुक्यात २२० हेक्टरचा समावेश आहे.
गेल्या २०२२-२३ या वर्षात नंदुरबार तालुक्यात १४४ पूर्णांक ८५ हेक्टरवर ४४५ शेतकऱ्यांनी, नवापूर तालुक्यात २३७ पूर्णांक ०२ हेक्टरवर ६५७ शेतकऱ्यांनी, अक्कलकुवा तालुक्यात ३४२ पूर्णांक ५८ हेक्टरवर ५२७ शेतकऱ्यांनी, शहादा तालुक्यात ४२३ पूर्णांक ०५ हेक्टरवर ४७३ शेतकऱ्यांनी,
तळोदा तालुक्यात १६० पूर्णांक ९० हेक्टरवर २१६ शेतकऱ्यांनी तर अक्राणी तालुक्यात ४१६ पूर्णांक ०५ हेक्टरवर ८१० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेवून लाभ घेतला असून एकूण १ हजार ७२७ पूर्णांक ४५ हेक्टरवर ३ हजार १२८ शेतकऱ्यांनी जिल्ह्यात लाभ घेतला आहे, अशीही माहिती पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली आहे.
या योजनेचा सर्वाधिक लाभ अक्राणी तालुक्यातील ८१० शेतकऱ्यांनी घेतला असून त्या खालोखाल नवापूर ६५७, अक्कलकुवा ५२७, शहादा ४७३, नंदुरबार ४४५, तळोदा २१६ शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. चालू वर्षात अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. गावित यांनी केले आहे.
दृष्टिक्षेपात ‘रोहयो’ मधून फळबाग लागवड
क्र | तालुका | 2022-2023 साध्य | 2023-24 चे उद्दिष्ट (हेक्टरमध्ये) | |
लाभार्थी संख्या | क्षेत्र हेक्टर | |||
1 | नंदुरबार | 445 | 144.85 | 480 |
2 | नवापूर | 657 | 237.02 | 480 |
3 | अक्कलकुवा | 527 | 342.58 | 360 |
4 | शहादा | 473 | 423.05 | 480 |
5 | तळोदा | 216 | 160.90 | 220 |
6 | अक्राणी | 810 | 416.05 | 220 |
एकूण | 3128 | 1724.45 | 2240 |